बैरुत (लेबेनॉन) – इस्रायलने मंगळवारी रात्री लेबेनॉनमधील शरणार्थ्यांच्या छावणीवर जोरदार हवाई हल्ला केला. या हल्ल्यामध्ये किमान १३ जण ठार झाले आहेत आणि अनेक जण जखमी झाले आहेत. लेबेनॉनच्या दक्षिणेकडील अईन एल- हिलवेह या अत्यंत दाटीवाटीच्या भागात पॅलेस्टिनी शरणार्थ्यांसाठी ही छावणी सुरू करण्यात आली होती. जवळपास वर्षभरापुर्वी इस्रायल आणि लेबेनॉनमदील हिज्बुल्लाहमध्ये युद्धबंदी करार झाल्यापासून इस्रायलने केलेला हा सर्वात मोठा हल्ला होता. लेबेनॉनच्या दक्षिणेकडील सुदोन या बंदराजवळ असलेल्या शरणार्थ्यांच्या या छावणीमध्येच हमासकडून एक ट्रेनिंग सेंटर चालवले जात होते. इस्रायलविरोधात नव्याने आणि अधिक प्रभावीपणे घातपाती हल्ले करण्याचे नियोजन या ट्रेनिंग सेंटरमधून केले जात होते, असा आरोप इस्रायलने केला आहे. लेबेनॉनमधील ही शरणार्थ्यांची छावणी पॅलेस्टिनी लोकांनीच भरलेली होती आणि तेथे कमालिचे दारिद्रय असल्याचे लेबेनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. हमासविरोधात इस्रायलने युद्ध पुकारल्यानंतर लेबेनॉनमधील हिज्बुल्लाहने हमासच्या पाठिंब्यासाठी इस्रायलवर रॉकेटचा मारा केला होता. त्याला इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर हिज्बुल्लाहला युद्धबंदी स्वीकारणे भाग पडले होते.