“मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे ‘महाशक्ती’ तर नाही?”; रोहिणी खडसेंनी व्यक्त केली शंका

Rohini Khadse On MNS Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी करत मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेना पक्षाच्या सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.यावरून मनसे नेते आक्रमक झाले झाले आहेत.
या याचिकेनंतर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठराखण केली. तसेच भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ‘मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे ‘महाशक्ती’ तर नाही ना?’ अशी शंका रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली आहे.
रोहिणी खडसे यांचे ट्वीट
“कालपासून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. पक्षाला विविध इशारे दिले जात आहेत, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे. बंधू राज साहेब, मराठी पक्षांचे, मराठी उद्योजकांचे, मराठी भाषेचे किंबहुना महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे काही पक्षांना वावडं आहे. कारण याआधीही मराठी माणसांनी बनवलेले दोन मराठी पक्ष फोडण्यात आले आहेत. तुम्ही एकदा तपासून घ्यावे मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही?”, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.
कालपासून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे, पक्षाला विविध इशारा दिले जात आहेत, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे.
बंधू राज साहेब, मराठी पक्षांचे, मराठी उद्योजकांचे, मराठी भाषेचे किंबहुना महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे काही पक्षांना वावगं आहे. कारण… pic.twitter.com/sPlMi1gTFM
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 9, 2025
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती व्हावी आणि व्यवहारात ही भाषा वापरली जावी, यासाठी आंदोलन सुरू केलं होतं. तसेच राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना )दिले होते. त्यानुसार, मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरला. यावेळी हिंसक आंदोलन झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
यावरून मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात सर्वोच न्यायालयात याचिका दाखल केली. “राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधातील हिंसेला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांच्या पक्षाची मान्यता देखील रद्द करावी”, असे शुक्ला यांनी याचिकेत म्हटले आहे.
हेही वाचा:
Video : धर्मेंद्र पाजींचा जबरदस्त डान्स.! ‘जाट’च्या स्पेशल स्क्रीनिंगला लावली हजेरी





