Ishan Kishan : इशान किशनचा IPL 2025 पूर्वी मोठा धमाका! सराव सामन्यात चौकार-षटकारांचा पाडला पाऊस, पाहा VIDEO

Ishan Kishan’s blistering innings video viral ahead IPL 2025 : यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन बऱ्याच काळापासून टीम इंडिया बाहेर आहे. आगामी आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी त्याला मुंबई इंडियन्सने रिलीज केले होते. त्यानंतर या लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याला ११.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएल २०२५ पूर्वी इशान किशन उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे. सनरायझर्स हैदराबादच्या इंट्रा-स्क्वॉड सामन्यात त्याने तुफान फटकेबाजी केली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
इंट्रा-स्क्वॉड सामन्यात इशान किशनचा धुमाकूळ –
सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन्ही इंट्रा-स्क्वॉड सामन्यांमध्ये इशान किशनचे धावसंख्या दाखवण्यात आली आहे. गेल्या हंगामापर्यंत मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा महत्त्वाचा भाग असलेल्या इशानने सनरायझर्ससाठी पहिल्या सराव सामन्यात आपल्या वादळी खेळीने लक्ष वेधून घेतले. त्याने २३ चेंडूत ६४ धावा केल्या, तर दुसऱ्या सराव सामन्यात ३० चेंडूत ७३ धावांची तुफानी खेळी साकारली.
Warming up in style 🔥
Ishan Kishan | #PlayWithFire pic.twitter.com/sNRWyi5Qnq
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 16, 2025
पहिल्या सराव सामन्यात, इशाने स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात केली. दोन्ही सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. अभिषेक ८ चेंडूत २८ धावा काढून बाद झाला. तो बाद होईपर्यंत संघाची धावसंख्या २.२ षटकांत ४६ धावांवर पोहोचली होती. अभिषेक बाद झाल्यानंतर, किशनने जलद खेळी करत अर्धशतक झळकावले. आठव्या षटकात कामिंदू मेंडिसने त्याला बाद केले. किशन बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या ७.२ षटकांत तीन बाद ११७ धावा होती.
गेल्या हंगामात इशानची बॅट थंडावली होती –
इशान २०१८ ते २०२४ पर्यंत सात हंगामांसाठी मुंबई इंडियन्सचा भाग होता. किशनने २०१६ मध्ये गुजरात लायन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. गेल्या हंगामातही या यष्टीरक्षक-फलंदाजाची कामगिरी तितकीशी चांगली नव्हती, त्याने १४ डावांमध्ये ३२० धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून फक्त एकच अर्धशतक निघाले होते. आता आयपीएल २०२५ साठी हैदराबादकडे अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड ही एक जबरदस्त सलामी जोडी आहे, त्यामुळे इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते.





