Aditya Thackeray : हे सरकार चालवत आहेत की कॉमेडी शो? आदित्य ठाकरेंचा शिक्षणमंत्री भुसेंना खोचक सवाल

मुंबई : राज्यात हिंदी भाषेची सक्ती करण्यात येऊ नये, याकरिता मनसेने 5 जुलैला मोर्चा आयोजित केला आहे. सत्ताधारी वगळता राज्यातील सर्वच पक्षातील नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. पण आता या हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर टीका करताना, हे सरकार चालवतायत की कॉमेडी शो? असा खोचक सवाल उपस्थित केला आहे.
यंदा इयत्ता पहिलीला तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा मौखिक असेल, पुस्तके नसतील, पण मास्तर मुलांना तिसरी भाषा शिकवतील, असे स्पष्टीकरण शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून देण्यात आले होते. हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना दादा भुसे यांच्याकडून याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले. Aditya Thackeray on Dada bhuse |
एका पत्रकाराने मंत्री दादा भुसे यांचे हे विधान सोशल मीडिया साइटवर पोस्ट केले. त्यांची ही पोस्ट आदित्य ठाकरे यांनी रिपोस्ट करत मंत्री दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावे आणि असे धडे घ्यावेत असा टोला लगावला आहे.
त्यांनी पुढे आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आधीच पहिलीतील मुलांवर तीन भाषा शिकण्याची सक्ती, त्यात पुस्तक नाही तर मौखिक अभ्यास. हे सरकार चालवतायत की कॉमेडी शो? काय बोलताय, काय ठरवताय, स्वतः जरा ऐकून बघा आणि ह्यांनाच आधी पहिलीत पाठवा ! तिथेही ‘नापास’ होतील! असा खोचक टोला आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. Education Minister Dada Bhuse |
त्यामुळे आता आदित्य यांच्या या टीकेला शिंदेसेनेचे नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, आदित्य ठाकरेंनी थेट शालेय शिक्षणमंत्र्यांनाच पहिलीत जाऊन बसण्याचा सल्ला दिल्याने यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आदित्य – संदीप देशपांडेंची भेट
आगामी मोर्चाच्या संदर्भात उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे व मनसेचे मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप देशपांडे यांची भेट झाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एका कार्यक्रमावेळी दोन्ही नेत्यांची भेट झाली, याचा व्हिडियो देखील आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी उद्धवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे देखील सोबत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुर्वी एकमेकांवर सतत्याने टीका-टिपणी करणारे नेते, मराठीच्या मुद्द्यावर एकवटले असून, कार्यकर्त्यांच्या एकमेकांसोबत गाठीभेटी देखील वाढल्या आहेत. Aditya Thackeray |




