पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काॅंग्रेसला धक्का; ‘या’ जेष्ठ नेत्या भाजपच्या वाटेवर? जिल्हा परिषद फिक्स करण्याचा प्रयत्न…

अकोले: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या ज्येष्ठ नेत्या सुनीता भांगरे भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात मोठे उधाण आले आहे. सुनीता भांगरे आणि त्यांचे पुत्र अमित भांगरे (राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष) यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतल्याने या चर्चांना बळ मिळाले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दावेदारी –
जिल्हा परिषद अध्यक्षपद यावेळी अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या सुनीता भांगरे या पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. त्यामुळे त्यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. भांगरे कुटुंब आणि विखे परिवाराचे जुने जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सध्या जिल्ह्यावर मंत्री विखे-पाटील यांचे राजकीय वर्चस्व असल्याने, सुनीता भांगरे यांचे नाव जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या चर्चेत आहे.
अमित भांगरे यांची भूमिका काय?
या भेटीच्या वेळी माजी आमदार वैभव पिचड आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे यांची उपस्थिती लक्षणीय होती. याच कारणामुळे भांगरे कुटुंबीयांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत अमित भांगरे यांना भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि अजित पवार गटाचे डॉ. किरण लहामटे यांच्यात झालेल्या तिरंगी लढतीत अल्पमतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी आणि त्यानंतरही अमित भांगरे यांनी आमदार लहामटे यांच्यावर शरद पवार यांची साथ सोडल्याबद्दल सडकून टीका केली होती, तसेच आपण शरद पवार यांची साथ कधीही सोडणार नाही, असे वारंवार जाहीर केले होते.
भांगरे-पिचड राजकीय हाडवैरी एकत्र येणार?
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता भांगरे आणि माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भांगरे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचे पुत्र अमित भांगरे हे भाजप प्रवेश करणार नसल्याचे समजते.
दिवंगत अशोक भांगरे यांनी विधानसभेच्या सहा निवडणुका माजी मंत्री पिचड यांच्या विरोधात लढवून राजकीय हाडवैर जपले होते. त्यामुळे, सुनीता भांगरे आणि दिलीप भांगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास, अनेक वर्षांपासूनचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले पिचड आणि भांगरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसतील, ही बाब जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी ठरू शकते.
ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीमुळे आणि भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.





