Madhuri Dixit Son : माधुरी दीक्षित होणार सासूबाई? लेक अरिनने गर्लफ्रेंडसोबत मारली दिवाळी पार्टीत एंट्री; VIDEO व्हायरल !
अरिन यावेळी एकटाच आला नव्हता, तर त्याच्यासोबत खुशी नावाची तरुणीही दिसली. पार्टीतील व्हायरल व्हिडिओमध्ये अरिन आणि खुशी एकमेकांच्या जवळ उभे राहून पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहेत.

Madhuri Dixit Son : बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत दिवाळी म्हणजे केवळ रोषणाई, फराळ आणि फटाक्यांचा उत्सव नाही, तर स्टार्सच्या ग्लॅमरस पार्ट्यांचीही मोठी पर्वणी असते. या पार्ट्यांमध्ये कोण काय परिधान करून आलं, कोण कोणासोबत दिसलं आणि कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय सुरू आहे, याकडे चाहत्यांचं बारीक लक्ष असतं. त्यात एखाद्या कलाकाराच्या कुटुंबातील सदस्याने खास व्यक्तीसोबत हजेरी लावली, तर चर्चांना उधाण येणारच!
यंदाच्या दिवाळीतही असंच काहीसं पाहायला मिळालं. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने आयोजित केलेल्या शानदार दिवाळी पार्टीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. मात्र, या सगळ्या ग्लॅमरमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या लेकाने.
माधुरीचा मोठा मुलगा अरिन नेने याने चक्क एका तरुणीसोबत पार्टीत हजेरी लावली. विशेष म्हणजे, ही तरुणी अरिनची कथित गर्लफ्रेंड असल्याची चर्चा रंगली असून, तिच्यासोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता माधुरी दीक्षित लवकरच सासूबाई होणार का? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
माधुरीच्या लेकाची खास व्यक्तीसोबत एंट्री!
५ नोव्हेंबर रोजी मुंबईत मनीष मल्होत्राच्या घरी या भव्य दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला करीना कपूर, सैफ अली खान, सारा अली खान, इब्राहिम अली खान, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. मात्र, माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत आलेल्या अरिन नेनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
अरिन यावेळी एकटाच आला नव्हता, तर त्याच्यासोबत खुशी नावाची तरुणीही दिसली. पार्टीतील व्हायरल व्हिडिओमध्ये अरिन आणि खुशी एकमेकांच्या जवळ उभे राहून पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहेत. अरिनने खुशीला जवळ घेतलं होतं. विशेष म्हणजे, या दोघांनी माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबतही एकत्र फोटो काढले. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
कोण आहे अरिनची कथित गर्लफ्रेंड खुशी?
अरिन आणि खुशी यांच्या नात्याबद्दल सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही वृत्तांनुसार, दोघेही गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे.
विशेष म्हणजे, दोघांनी यापूर्वी अमेरिकेतील एकत्र घालवलेल्या क्षणांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. खुशीच्या एका पोस्टवर अरिनने ‘My heart’ अशी कमेंट केल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.
मात्र, अरिन किंवा खुशी यांनी अद्याप आपल्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे ती अरिनची गर्लफ्रेंड असल्याच्या चर्चांना सध्या केवळ अंदाज आणि सोशल मीडियावरील पोस्टचा आधार आहे.
माधुरी होणार सासूबाई? चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण!
अरिन आणि खुशीचे एकत्र फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘माधुरीची होणारी सून आहे का?’, ‘माधुरी लवकरच सासूबाई होणार वाटतंय’, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून दिल्या जात आहेत. काहींनी या जोडीचं कौतुक केलं आहे, तर काहींनी माधुरीच्या चेहऱ्यावरील हावभावांवरूनही गंमतीशीर टिप्पणी केली आहे.






