Sunil Tatkare : “दोन्ही पक्षांचे विलीनीकरण झाले असते…”; सुनील तटकरेंचा खळबळजनक दावा
अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार गटाकडूनही विलीनीकरणाच्या चर्चांना दुजोरा देण्यात आला होता. शरद पवार यांनी १२ फेब्रुवारी ही संभाव्य तारीख असल्याचे सांगितले होते

Sunil Tatkare – अजितदादा हयात असते तर आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्या असत्या. १२ फेब्रुवारीला दोन्ही पक्षांचे विलीनीकरण झाले असते, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
सुनील तटकरे म्हणाले, अजित पवार यांच्या हयातीत विलीनीकरणाबाबत निश्चितपणे चर्चा झाली होती. एवढंच नव्हे, तर विलीनीकरण कसं होणार, याबाबतही अजितदादांनी भूमिका स्पष्ट केली होती. मी अजितदादांचा जवळचा सहकारी होतो. त्यामुळे या विषयाची मला पूर्ण माहिती आहे. त्यांच्या प्रखर इच्छाशक्तीतून विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असती.
मात्र, २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातात अजितदादांचे निधन झाले आणि त्यानंतर पुढील घडामोडी घडू शकल्या नाहीत, असेही तटकरे म्हणाले. यामुळे आता दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली होणार का आणि १० तारखेनंतरच्या चर्चेत नेमकं काय ठरणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार गटाकडूनही विलीनीकरणाच्या चर्चांना दुजोरा देण्यात आला होता. शरद पवार यांनी १२ फेब्रुवारी ही संभाव्य तारीख असल्याचे सांगितले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार यांच्याशी या संदर्भात चर्चा झाल्याचे म्हटले होते.






