Pune District : बेजबाबदार पोलीस पाटलांना कार्यमुक्त करावे

बारामती : अकार्यक्षम व बेजबाबदार पोलीस पाटील यांच्यावर सदोष आरोपपत्र दाखल करून पोलीस पाटील पदावरून मुक्त करावे, अशी मागणी जमीन हक्क परिषदेचे बारामती तालुका अध्यक्ष युवराज पोटे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
संबंध राज्यामध्ये टप्याटप्याच्या स्वरूपात नवनियुक्त पोलीस पाटील पदाच्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण करून, त्या सर्वांना पोलीस पाटील पदाचे अधिकार व कर्तव्य बहाल करण्यात आले होते. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे व अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनास माहिती देऊन मदत करणे इत्यादी जबाबदारीचे कर्तव्य असूनही बहुतांश पोलीस पाटील अकार्यक्षम व बेजबाबदारपणे आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
अशा पोलीस पाटील यांना सदोष आरोपपत्र दाखल करून पोलीस पाटील पदाच्या कर्तव्यातून तात्काळ मुक्त करून नव्याने कार्यक्षम पोलीस पाटील उमेदवारांची भरती प्रक्रिया करावी. हा विषय तारांकित किंवा लक्षवेधीमध्ये घेऊन तमाम राज्यातील जनतेरा आश्वासित करावे असेही पोटे यांनी निवेदनात म्हटले आहे. विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव (महसूल) यांना मेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे.





