ICC Test Rankings : आयसीसीने बुधवारी नवीन कसोटी क्रमवारीची यादी जाहीर केली. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंची चमक पाहायला मिळाली. यामध्ये भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रविचंद्रन अश्विनला मागे टाकत गोलंदाजीत अव्वल स्थान पटकावले आहे. तर दुसरीकडे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत अव्वल-10 मध्ये परतला आहे. कोहलीने सहा स्थानांची झेप घेत आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत सहावे स्थान पटकावले आहे. याव्यतिरिक्त जैस्वाल आता आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
जैस्वालची यशस्वी कामगिरी…
जैस्वालने आयसीसी फलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या दोन दिग्गजांना मागे टाकत आपला झेंडा रोवला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. आयसीसी क्रमवारीत त्याने 792 गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. जैस्वालला 2 स्थानांचा फायदा झाला आहे. यापूर्वी तो पाचव्या स्थानावर होता. त्याने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांना मागे टाकले. स्मिथची 757 गुणांसह चौथ्या स्थानावर तर ख्वाजाची 728 गुणांसह पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
अव्वल स्थान मिळवण्याची संधी…
भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या मालिकेत जैस्वालने दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये शानदार खेळ केला. पहिल्या सामन्यात त्याने 56 आणि 10 धावांची इनिंग खेळली होती. याशिवाय दुसऱ्या सामन्यात त्याने 72 आणि 51 धावा केल्या. कानपूरमधील दोन्ही डावांत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जयस्वालला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते. आगामी न्यूझीलंड कसोटी मालिकेत जयस्वालने अशीच कामगिरी केल्यास तो लवकरच पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत जो रूट 899 गुणांसह अव्वल तर केन विल्यमसन 829 गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
ICC Test Rankings : बुमराह बनला कसोटीतील अव्वल गोलंदाज, ‘या’ गोलंदाजाची संपवली बादशाहत…
कोहलीने घेतली मोठी झेप…
चेन्नई कसोटीत 6 आणि 17 धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल 10 मधून बाहेर पडला होता. तथापि, कानपूर कसोटीत पुनरागमन करताना, त्याने 47 आणि नाबाद 29 धावांची खेळी खेळून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यासह तो ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत 724 गुणंसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी तो 12 व्या स्थानावर होता.
पंत,रोहितची घसरण…..
याशिवाय भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही 718 गुणांसह 9व्या स्थानावर आहे. त्याला 3 स्थानांचे नुकसान झाले आहे. मात्र, त्यानंतरही तो टॉप 10 च्या यादीत कायम आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माचीही पाच स्थानांनी घसरण झाली आहे. तो सध्या 693 गुणांसह 15 व्या स्थानावर आहे. त्याचबरोबर भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल हा 14 व्या स्थानावरून 16 व्या स्थानावर पोहचला आहे. त्याचे 684 गुण आहेत.