Amir Nasirzadeh killed: इराणला मोठा धक्का! संरक्षण मंत्री अमीर नासिर्झादेह ठार; खामेनेईंना हलवले सुरक्षित स्थळी
Amir Nasirzadeh killed: इस्रायलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान हेही या हल्ल्यांचे लक्ष्य होते. मात्र त्यांच्या जीविताबद्दल अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही.

Amir Nasirzadeh killed: अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे संरक्षण मंत्री अमीर नासिर्झादेह आणि रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर मोहम्मद पाकपूर ठार झाले असल्याचे वृत्त रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने तीन सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
कोण होते नासिर्झादेह?
नासिर्झादेह हे संरक्षणमंत्री होण्यापूर्वी इराणी सशस्त्र दलांचे उपप्रमुख होते. लष्करी कारकीर्दीची सुरुवात त्यांनी लढाऊ वैमानिक म्हणून केली होती. इराणच्या संरक्षण व्यवस्थेतील ते एक अत्यंत महत्त्वाचे आणि अनुभवी नेते मानले जात होते.
हल्ले आणि प्रत्युत्तर –
शनिवारी पहाटे सुरू झालेले हे हल्ले सुरुवातीला केवळ इस्रायलचे असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नंतर हे अमेरिका-इस्रायलचे संयुक्त लष्करी अभियान असल्याचे जाहीरपणे मान्य केले. हे हल्ले इराणला अण्वस्त्रसंपन्न होण्यापासून रोखणे आणि अमेरिकेच्या सुरक्षिततेला असलेला धोका संपवणे या उद्देशाने करण्यात आल्याचे ट्रम्प म्हणाले.
इराणने तातडीने प्रत्युत्तर देत इस्रायलवर आणि आखाती देशांतील अमेरिकी लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली. संयुक्त अरब अमिराती, बहरीन, सौदी अरेबिया आणि कुवेत या देशांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे.
खामेनेई, पेझेश्कियान यांना लक्ष्य केले?
इस्रायलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान हेही या हल्ल्यांचे लक्ष्य होते. मात्र त्यांच्या जीविताबद्दल अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. एका सूत्राने सांगितले की खामेनेई तेहरानमध्ये नव्हते आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
इराणच्या सत्तावर्तुळाशी जवळीक असलेल्या एका सूत्राने सांगितले की रिव्होल्युशनरी गार्ड्सचे अनेक वरिष्ठ कमांडर आणि राजकीय अधिकारी या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडले आहेत. इराणच्या सरकारी माध्यमांनी एका शाळेवर झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात ४० जण ठार झाल्याचे सांगितले असले तरी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही.
हेही वाचा – ‘खूप चिंतेचा विषय’! इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांवर भारताची पहिली प्रतिक्रिया
इराण सरकारला उलथवण्याचे आवाहन –
ट्रम्प यांनी इराणच्या सुरक्षा दलांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले असून इराणी जनतेला स्वतःच्या सरकारला उलथवून टाकण्यास प्रोत्साहित केले आहे. डिसेंबर २०२५ पासून इराणमध्ये सुरू झालेल्या सरकारविरोधी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी या हस्तक्षेपाची धमकी देत आली होती, त्याचेच हे पर्यवसान असल्याचे मानले जाते.





