India Reaction On US- Iran Tension: ‘खूप चिंतेचा विषय’! इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांवर भारताची पहिली प्रतिक्रिया
India Reaction On US- Iran Tension: सर्व भारतीय विमान कंपन्यांना हवाई क्षेत्र सूचना आणि मार्ग निर्बंधांवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून आवश्यकतेनुसार उड्डाणे वळवण्याचे आदेशही दिले आहेत.

India Reaction On US- Iran Tension:अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांबाबत भारताने शनिवारी पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) “गंभीर चिंता” व्यक्त करत सर्वांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?
“इराण आणि आखाती प्रदेशातील ताज्या घडामोडींबाबत भारत अत्यंत चिंतित आहे. सर्वांनी संयम बाळगावा, तणाव वाढवणे टाळावे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे,” असे मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. “तणाव कमी करण्यासाठी आणि मूळ प्रश्न सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबावा. सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांचा आदर केला गेला पाहिजे,” असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
९० लाख भारतीयांची काळजी –
मध्यपूर्वेत अडकलेल्या सुमारे ९० लाख भारतीयांच्या सुरक्षेबाबत मंत्रालयाने सांगितले की, “प्रदेशातील आपले दूतावास भारतीय नागरिकांच्या संपर्कात असून त्यांना सतर्क राहण्याच्या, दूतावासाशी संपर्कात राहण्याच्या आणि स्थानिक सुरक्षा सूचनांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” मध्यपूर्वेतील हवाई क्षेत्र बंद असल्याने सध्या कोणत्याही निर्वासन योजनेची घोषणा करण्यात आलेली नाही.
हेही वाचा – “सावध राहा, घराबाहेर पडू नका”; इस्रायलमधील भारतीयांना दूतावासाचा इशारा
विमानतळ सतर्क, उड्डाणे ठप्प –
नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन यांनी सर्व संबंधित घटकांसोबत आढावा बैठक घेतली. देशभरातील विमानतळे, विशेषतः प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळे, संभाव्य उड्डाण वळवणी आणि अनियोजित लँडिंगसाठी सज्ज ठेवण्यात आल्याचे मंत्रालयाने सांगितले. एअर इंडिया आणि इंडिगोने मध्यपूर्वेतील सर्व उड्डाणे आधीच स्थगित केली आहेत. सर्व भारतीय विमान कंपन्यांना हवाई क्षेत्र सूचना आणि मार्ग निर्बंधांवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून आवश्यकतेनुसार उड्डाणे वळवण्याचे आदेशही दिले आहेत.





