Iran Crisis: मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये सुमारे ९ हजार भारतीय नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर सुरू केलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली असून या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार विविध पर्यायांचा विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी बहुतेक विद्यार्थी जम्मू-काश्मीर येथील आहेत. याशिवाय उत्तर प्रदेश आणि इतर काही राज्यांतील विद्यार्थीही तेथे शिक्षणासाठी गेलेले आहेत. हे विद्यार्थी प्रामुख्याने तेहरान आणि कोम या शहरांमध्ये अडकले आहेत. परिस्थिती गंभीर होत असल्याने भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि इराणमधील भारतीय दूतावास सतत संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारीपासून इराणवर हवाई हल्ले सुरू केल्यानंतर इराणने देशातील हवाई वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना थेट विमानाने भारतात आणणे सध्या शक्य नाही. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पर्यायी मार्गांचा विचार सुरू केला आहे. केंद्र सरकारमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना रस्त्याने शेजारील देशांमध्ये नेण्याची योजना आखली जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम आर्मेनिया किंवा तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये सुरक्षितपणे हलवले जाईल. त्यानंतर त्या देशांमधून विमानाद्वारे त्यांना भारतात आणले जाईल. परदेशी नागरिकांना बाहेर पडण्यासाठी तुर्कमेनिस्तानने इराण सीमेवरील काही अतिरिक्त तपासणी नाकेही खुले केले आहेत. iran-israel-conflic याचदरम्यान, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी येत्या काही दिवसांत इराणवरील हल्ले आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झाले असून अडकलेल्या भारतीयांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासानेही विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. काही विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून काही विद्यार्थी कोम शहरात पोहोचले आहेत. मात्र तेथेही स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी घाबरले असून त्यांनी भारत सरकारकडे लवकरात लवकर सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्याची मागणी केली आहे. दूतावासाने सर्व भारतीयांना घराबाहेर न पडण्याचे आणि अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, गेल्या वर्षीही इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढल्यानंतर भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंधू’ ही मोहीम राबवून सुमारे ३५०० भारतीयांना सुरक्षित भारतात आणले होते. यामध्ये विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक आणि यात्रेकरूंचा समावेश होता. सध्याच्या परिस्थितीतही अशाच प्रकारची मोहीम राबवली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संबंधित देशांच्या नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक निर्णय लवकरच घेतले जातील, असेही सांगितले जात आहे.