#IPL2023 #SRHvRR : ‘चहल-बोल्ट’ची उत्कृष्ट गोलंदाजी, राजस्थानचा हैदराबादवर ‘रॉयल’ विजय

हैदराबाद :- यशस्वी जयस्वाल, जोस बटलर व संजू सॅमसन यांची अर्धशतकी खेळी व यजुवेंद्र चहल आणि ट्रेन्ट बोल्ट यांची भेदक गोलंदाजी यांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेत रविवारी झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा 72 धावांनी सहज पराभव केला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना द्विशतकी धावसंख्या उभारल्यानंतर राजस्थानने हैदराबादचा डाव 131 धावांवर रोखला. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. पहिल्याच षटकांत अभिषेक शर्मा परतला. त्यानंतर त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर राहुल त्रिपाठीही बाद झाला. बोल्टने या दोघांना बाद केले.
हॅरी ब्रुक 13 धावांवर बाद झाला. यावेळी 23 चेंडूत 27 धावा करत मंयक आग्रवालही परतला. वॉशिंग्टन सुंदर व ग्लेन फिलिप्स यांनी साफ निराशा केली. अब्दुल समदने नाबाद 32 धावा केल्या. त्याच्या जोडीला आदील रशिदने 18 तर उमरान मलिकने नाबाद 19 धावा करत थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र, ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.
बोल्टने दिलेल्या झटक्यानंतर चहलने आपल्या लेग स्पीनवर हैदराबादच्या फलंदाजीतील हवाच काढून घेतली. चहलने सर्वाधिक 4 गडी बाद केले तर बोल्टने 2 बळी मिळवले. जेसन होल्डर व रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, यशस्वी जयस्वाल, जोस बटलर व संजू सॅमसन यांच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 203 धावांचा डोंगर उभारला.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार भूवनेश्वर कुमारने नाणेफेक जिंकत राजस्थानला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय साफ चुकीचा ठरवताना जयस्वाल व बटलरने वादळी फलंदाजी केली. या जोडीने सहाव्या षटकातच 85 धावांची सलामी दिली. जयस्वाल व बटलरने हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.
बटलरने अवघ्या 22 चेंडूत 7 चौकार व 3 षटकरांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर आलेल्या सॅमसननेही जयस्वालला सुरेख साथ देत संघाचे शतक फलकावर लावले. जयस्वालही अर्धशतक पूर्ण झाल्यावर 54 धावांवर परतला. या खेळीत त्याने 37 चेंडूत 7 चौकार फटकावले. त्यानंतर देवदत्त पडीक्कल व रायम परागने साफ निराशा केली. समोरून एकेक फलंदाज बाद होत असतानवा सॅमसनने मात्र, सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेत चौफेर फटकेबाजी केली. त्यानेही अर्धशतक साकार केले. मात्र, त्यानंतर आनावश्यक फटका मारताना तो 55 धावांवर बाद झाला. त्याने 32 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली.
शेमरन हेटमायरने रवीचंद्रन अश्विनच्या साथीत संघाला द्विशतकी मजल मारुन दिली. हेटमायरने नाबाद 22 धावांच्या खेळीत 16 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावला. अश्विन 1 धाव काढून नाबाद राहिला. हैदराबादकडून टी. नटराजन व फजलहक फारुखी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 5 बाद 203 धावा. (संजू सॅमसन 55, यशस्वी जयस्वाल 54, जोस बटलर 54, शेमरन हेटमायर नाबाद 22, रवीचंद्रन अश्विन नाबाद 1, टी. नटराजन 2-23, फजलहक फारुखी 2-41).
सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 8 बाद 131 धावा. (हॅरी ब्रुक 13, आदील रशीद 18, मयंक आग्रवाल 27, अब्दुल समद नाबाद 32, उमरान मलिक नाबाद 19, यजुवेंद्र चहल 4-17, ट्रेन्ट बोल्ट 2-21, जेसन होल्डर 1-16, रवीचंद्रन अश्विन 1-27).





