नवी दिल्ली – जीएसटीचे दोन स्लॅब रद्द झाल्याने याचा सर्वाधिक फटका इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सारख्या स्पर्धांवर दिसून येणार आहे. आता आयपीएलसारख्या क्रीडा स्पर्धांच्या तिकिटांवर 40 टक्के जीएसटी आकारला जाईल. त्यामुळे प्रेक्षकांच्या खिशावर अतिरिक्त भार वाढू शकतो. तर दुसरीकडे, मान्यताप्राप्त क्रीडा स्पर्धेचे तिकीट 500 रुपयांपर्यंत असेल आणि ते पूर्वीप्रमाणेच जीएसटीमुक्त राहील. त्याचवेळी, 500 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तिकिटांवर 18 टक्के दराने जीएसटी सुरू राहील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त क्रीडा स्पर्धांच्या प्रेक्षकांवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही. सरकारने विशेषतः आयपीएलचा उल्लेख केला आहे. जीएसटीमधील हाच बदल प्रो कबड्डी लीग (पीकेएल) आणि इंडियन सुपर लीग (आयएसएल) सारख्या लीगवर देखील लागू होईल का, हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, जीएसटी कौन्सिलने सट्टेबाजी, जुगार, लॉटरी, घोड्यांच्या शर्यती आणि ऑनलाइन मनी गेमिंग सारख्या क्रियाकलापांना 40 टक्के कर श्रेणीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सरकारला अतिरिक्त महसूल मिळणार आहे. त्यामुळे जीएसटी बदलाचा निर्णय सरकारचा महसूल वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असले तरी दीर्घकाळात त्याचा परिणाम प्रेक्षकांच्या सहभागावर आणि क्रीडा स्पर्धांच्या लोकप्रियतेवर देखील दिसून येण्याची शक्यता आहे.