IPL Season Split : क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठी बातमी! वर्षातून एकदा नाही तर दोनदा होणार आयपीएल; BCCI चा ९४ सामन्यांचा मेगा प्लॅन
IPL Season Split : सध्या आयपीएलच्या एका हंगामात एकूण ७४ सामने खेळवले जातात. भविष्यात ही संख्या वाढवून ९४ सामने करण्याची बीसीसीआयची अधिकृत योजना आहे.

IPL Split Into Two Phases : जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय टी-२० लीग मानल्या जाणाऱ्या ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये (आयपीएल) आगामी काळात अत्यंत क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आयपीएलचा संपूर्ण हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होऊन मे महिन्याच्या शेवटी संपत होता. मात्र, भविष्यात सामन्यांची संख्या वाढवण्याचा विचार सुरू असल्याने, या स्पर्धेचे पारंपरिक स्वरूप आणि वेळापत्रक पूर्णपणे बदलू शकते. आयपीएल आता वर्षातून दोन वेगवेगळ्या टप्प्यांत आयोजित करण्याचा ऐतिहासिक पर्याय बीसीसीआय समोर आला आहे.
सामन्यांची संख्या ७४ वरून थेट ९४ होणार!
सध्या आयपीएलच्या एका हंगामात एकूण ७४ सामने खेळवले जातात. भविष्यात ही संख्या वाढवून ९४ सामने करण्याची बीसीसीआयची अधिकृत योजना आहे. मात्र, इतके सामने सलग दोन महिन्यांत आयोजित करणे अत्यंत आव्हानात्मक ठरू शकते. विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यात भारतातील बहुतांश राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट असते. या दमट हवामानामुळे खेळाडूंचा फिटनेस आणि त्यांच्या दुखापतींच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. याच गंभीर समस्येवर तोडगा म्हणून आयपीएलचे दोन भाग करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.
IPL chairman Arun Dhumal said weather and future scheduling demands are pushing BCCI to examine alternate windows, including September-October and a possible split-season format.
Speaking to Sportstar, Dhumal said discussions around the tournament’s future structure have gained… pic.twitter.com/iEXTYbvDu0
— Cricketopia (@CricketopiaCom) May 27, 2026
फेब्रुवारी आणि सप्टेंबर: असा असेल आयपीएलचा नवा पॅटर्न!
आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ‘फ्यूचर टूर प्रोग्राम’ (FTP) आणि अधिकृत ब्रॉडकास्टर्ससोबत सकारात्मक चर्चा झाली, तर आयपीएलचा हंगाम दोन भागांत विभागला जाईल.
- पहिला टप्पा: फेब्रुवारीच्या अखेरीपासून सुरू होऊन एप्रिल महिन्यापर्यंत खेळवला जाईल.
- दुसरा टप्पा: सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केला जाऊ शकतो.
सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान भारतातील पावसाळा संपलेला असतो आणि हिवाळ्याची चाहूल लागल्याने हवामान अतिशय आल्हाददायक असते. त्यामुळे परदेशी आणि भारतीय खेळाडूंना खेळण्यासाठी अनुकूल वातावरण मिळेल.
कोट्यवधींचा आर्थिक फायदा; २०२७ नंतर होणार अंमलबजावणी!
ऑक्टोबर महिन्यात भारतात दिवाळी आणि दसऱ्यासारख्या मोठ्या सणांचा हंगाम सुरू होतो. या सणासुदीच्या काळात बाजारपेठेत जाहिरातींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. याचा थेट आर्थिक फायदा ब्रॉडकास्टर्ससह आयपीएल व्यवस्थापन आणि बीसीसीआयला होऊ शकतो. बीसीसीआय या प्रस्तावावर सध्या गांभीर्याने विचार करत असून, २०२७ नंतरच्या नवीन वेळापत्रक चक्रात हा बदल लागू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे २०२८ किंवा २०२९ पासून चाहत्यांना वर्षातून दोनदा आयपीएलचा थरार पाहायला मिळू शकतो.





