IPL 2025 CSK vs MI : हार्दिक पंड्यावर पहिल्याच सामन्यात बंदी! चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ खेळाडू करणार मुंबईचं नेतृत्त्व

IPL 2025 Hardik confirms Surya will lead MI against CSK : आयपीएल २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्याने सुरुवात होणार आहे. मात्र, स्पर्धेतील सर्वात मोठा सामना २३ मार्च रोजी सीएसके विरुद्ध एमआय संघात होणार आहे. या सामन्यांसाठी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे तो संघाच्या पहिल्याच सामन्याला मुकणार आहे. अशा परिस्थितीत, हार्दिक पंड्या बंदीमुळे पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे? चला तर मग याबद्दल जाणून घेऊया.
हार्दिक पंड्याने स्वतः याचे उत्तर दिले आहे आणि आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात संघाचे नेतृत्व करणाऱ्या आणि संपूर्ण हंगामासाठी संघाचा उपकर्णधार असलेल्या खेळाडूचे नाव सांगितले आहे. सीएसके विरुद्धच्या सामन्यात भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करेल. याबाबात हार्दिक पंड्याने आयपीएल २०२५ च्या आधी पत्रकार परिषदेत पुष्टी केली आहे.
हार्दिक पंड्यावर या सामन्यासाठी का बंदी घातली?
हार्दिक पंड्या गेल्या हंगामात मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि तो संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्सला तीनदा स्लो ओव्हर रेटसाठी शिक्षा झाली आणि आयपीएलच्या नियमांनुसार, जर एखादा कर्णधार लीग टप्प्यातील तीन सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला तर त्याला पुढील सामन्यासाठी बंदी घातली जाते. त्यानुसार हार्दिकचा तिसरा सामना गेल्या हंगामातील शेवटचा लीग सामना होता. त्यामुळे, त्याची बंदी आयपीएलच्या पुढील हंगामासाठी लागू होणार होती, जो आयपीएल २०२५ मधील संघाचा पहिला सामना असेल.
मुंबई इंडियन्स आयपीएल २०२५ मध्ये त्यांचा पहिला सामना २३ मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळेल. दोन्ही संघ पाच वेळा आयपीएल चॅम्पियन आहेत. त्यामुळे दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्जने शेवटचे जेतेपद २०२३ मध्ये पटकावले होते, परंतु मुंबईने शेवटचे जेतेपद २०२० मध्ये मिळवले होते. या सामन्याला एल क्लासिको म्हणतात.





