Prabhsimran Nishant Collision : मैदानावर काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! कॅच घेताना भारतीय खेळाडूंची भयानक टक्कर, VIDEO होतोय व्हायरल
Prabhsimran Nishant Collision : ऑस्ट्रेलिया 'अ' आणि भारत 'अ' यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान एक मोठी दुर्घटना टळली. झेल घेण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षक प्रभसिमरन सिंग आणि क्षेत्ररक्षक निशांत सिंधू यांची टक्कर झाली.

Prabhsimran Nishant Horrific Collision Video Viral in IND A vs AUS A 1st ODI Match : भारत दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलिया ‘ए’ आणि इंडिया ‘ए’ यांच्यातील दोन अनधिकृत कसोटी सामन्यांनंतर आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. पुद्दुचेरीच्या सीचेम मैदानावर पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मैदानावर एक मोठा अनर्थ थोडक्यात टळला. ऑस्ट्रेलियन डावाच्या सुरुवातीलाच झेल टिपण्याच्या नादात भारताचा यष्टिरक्षक प्रभसिमरण सिंग (Prabhsimran Singh) आणि क्षेत्ररक्षक निशांत सिंधू (Nishant Sindhu) एकमेकांना जोरात धडकले. सुदैवाने या भीषण धडकेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
हवेत चेंडू अन् दोघांची जोरदार धडक; प्रभसिमरनने घेतला कॅच!
ही घटना ऑस्ट्रेलियन डावाच्या सुरुवातीलाच घडली. वेगवान गोलंदाज यश ठाकूरच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन सलामीवीर मिचेल ओवेनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची कड घेऊन पॉईंट आणि यष्टिरक्षकाच्या मध्ये खूप उंच उडाला. झेल घेण्यासाठी प्रभसिमरण धावत आला, तर निशांत सिंधूही तिकडेच धावला. दोघांमध्ये ‘कॉल’ न झाल्यामुळे ते वेगाने एकमेकांना धडकले. धडक होऊनही प्रभसिमरनने झेल सोडला नाही; मात्र या निष्काळजीपणामुळे निशांत सिंधू मैदानावर चांगलाच संतापलेला दिसला.
यश ठाकूर-अरशद खानचा मारा; ऑस्ट्रेलियाचे टॉप ऑर्डर उद्ध्वस्त!
Yash Thakur gets the big fish! 🎣
Mitchell Owen departs as India A get their first wicket.🔥
#INDAvAUSA 👉 Streaming Live Now https://t.co/zk2ABY21JG https://t.co/ptGL7Ho9M1
— Star Sports (@StarSportsIndia) October 6, 2026
या थरारक प्रसंगानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर जबरदस्त वर्चस्व गाजवले. यश ठाकूर आणि अरशद खान यांनी नव्या चेंडूवर भेदक मारा करत कांगारूंच्या फलंदाजांना रोखून धरले. यश ठाकूरने मिचेल ओवेनपाठोपाठ सॅम कोन्स्टास यालाही लगेच तंबूचा रस्ता दाखवून ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले.
निशांत-सूर्यांशच्या फिरकीनंतर कांगारुंचे दमदार कमबॅक –
पॉवरप्ले संपल्यानंतर निशांत सिंधू आणि सूर्यांश शेडगे या फिरकी जोडीने मोर्चा सांभाळला. दोघांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत प्रत्येकी एक महत्त्वपूर्ण विकेट पटकावली. भारतीय गोलंदाजांच्या या सांघिक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट झाली आणि त्यांचा निम्मा संघ अवघ्या ८७ धावांत पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर कांगारुच्या फलंदाजांनी दमदार कमबॅक करत संघाला ४८.२ षटकांत सर्वबाद २७४ धावांचा टप्पा गाठून दिला.





