IPL 2025 Captains : सर्व १० संघांचे कर्णधार झाले निश्चित, फक्त ‘या’ एकाच संघाचा कर्णधार आहे परदेशी

IPL 2025 List of captains of all 10 teams : दिल्ली कॅपिटल्सने आगामी आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी अक्षर पटेलला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. अक्षर ऋषभ पंतची जागा घेईल, ज्याला मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीमधून रिलीज करण्यात आले होते. आता अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ पहिल्यांदाच जेतेपदावर नाव करण्यासाठी प्रयत्न करेल. अशा प्रकारले आयपीएल २०२५ साठी सर्व संघाचे कर्णधार निश्चित झाले आहेत, ते कोण आहेत? जाणून घेऊया.
अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार झाल्यानंतर, आयपीएल २०२५ च्या सर्व संघांचे कर्णधार निश्चित झाले आहेत. १० पैकी ९ संघांनी त्यांच्या कर्णधारांची घोषणा खूप आधीच केली होती, पण दिल्ली संघाने सस्पेन्स कायम ठेवला होता. आधी असा अंदाज व्यक्त केला जात होता की, केएल राहुल संघाची धुरा सांभाळू शकतो. पण शेवटी संघ व्यवस्थापनाने अक्षर पटेलवर विश्वास व्यक्त करत कर्णधारपदाची माळ त्याच्या गळ्यात टाकली.
या ५ संघांनी नवीन कर्णधारांवर व्यक्त केला विश्वास –
आयपीएल २०२५ मध्ये, १० पैकी ५ संघ नवीन कर्णधारांसह खेळताना दिसतील. अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसेल. लखनौ सुपर जायंट्सची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर असेल. यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळेल. त्याच वेळी, पंजाब किंग्ज श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल, तर कोलकाता नाईट रायडर्स अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल.
या पाच संघांव्यतिरिक्त, उर्वरित ५ संघांनी त्यांचे जुने कर्णधार कायम ठेवले आहेत. सर्व १० संघांपैकी ९ कर्णधार भारतीय आहेत, तर फक्त एक कर्णधार परदेशी आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व पॅट कमिन्स हा एकमेव परदेशी कर्णधार करेल. आयपीएल २०२३ पासून संजू सॅमसन हा एकमेव कर्णधार आहे, ज्याला त्याच्या संघाचा कर्णधार म्हणून कायम ठेवले आहे. तेव्हापासून उर्वरित सर्व ९ संघांनी त्यांचे कर्णधार बदलले आहेत.
आयपीएल २०२५ मधील सर्व १० संघांच्या कर्णधारांची यादी:
मुंबई इंडियन्स (एमआय) – हार्दिक पंड्या
चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) – ऋतुराज गायकवाड
कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) – अजिंक्य रहाणे
सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) – पॅट कमिन्स
गुजरात टायटन्स (जीटी) – शुबमन गिल
राजस्थान रॉयल्स (आरआर) – संजू सॅमसन
लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) – ऋषभ पंत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) – रजत पाटीदार
पंजाब किंग्ज (पीबीकेएस) – श्रेयस अय्यर
दिल्ली कॅपिटल्स (डीसी) – अक्षर पटेल





