Indian Premier League 2024 Schedule & BCCI : IPL 2024 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बीसीसीआयने 22 फेब्रुवारीला वेळापत्रक जाहीर केले. परंतु संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, तर केवळ पहिल्या 21 सामन्यांची घोषणा करण्यात आली आहे. पण बीसीसीआयने असे का केले? याचे उत्तर या बातमीव्दारे जाणून घेऊया.
वास्तविक, यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे या स्पर्धेचे वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर होणार आहे. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक निवडणुकीच्या तारखांनंतर जाहीर केले जाईल. सध्या फक्त 7 एप्रिलपर्यंत होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आता निवडणुकीची तारीख कधी येते आणि उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक कधी जाहीर होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात होणार पहिला सामना…
IPL 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. चेन्नई या स्पर्धेची सुरुवात आपल्या घरच्या मैदानाने करेल, म्हणजेच पहिला सामना चेन्नईत होणार आहे. 7 एप्रिल रोजी दुहेरी सामना दिसेल. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुपारी 3.30 वाजता होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजता होईल.
या ठिकाणी खेळवले जाणार 21 सामने….
IPL 2024 चे पहिले 21 सामने चेन्नई, मोहाली, कोलकाता, जयपूर, अहमदाबाद, बेंगळुरू, लखनौ, विशाखापट्टणम, हैदराबाद आणि मुंबई येथे खेळवले जातील.
गेल्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज ठरला होता चॅम्पियन…
चेन्नई सुपर किंग्सने मागील हंगामात म्हणजेच आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले होते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने डकवर्थ-लुईस नियमानुसार अंतिम फेरीत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला. गुजरातला हरवून चेन्नई पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनले. 2023 मध्ये गुजरात टायटन्स गतविजेता होता.