RR vs CSK IPL 2026 Biggest Win : बरसापारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला ८ गडी राखून पराभूत केले. १२८ धावांचे छोटे लक्ष्य राजस्थानने केवळ १२.१ षटकात गाठले. यासह सर्वाधिक ४७ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवण्याच्या बाबतीत राजस्थानचा हा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०१४ मध्ये आरसीबीविरुद्ध त्यांनी ४२ चेंडू राखून विजय मिळवला होता, तो विक्रम आज मोडीत निघाला आहे. राजस्थानचा चेन्नईविरुद्ध १६ वा विजय – या विजयासह राजस्थान रॉयल्सने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. चेन्नईला आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हरवणाऱ्या संघांच्या यादीत राजस्थान आता पंजाब किंग्ससह (१६ विजय) संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत मुंबई इंडियन्स २१ विजयांसह अव्वल स्थानी आहे. चेन्नईच्या फलंदाजांची शरणागती – नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब झाली. संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड प्रत्येकी ६ धावा करून स्वस्तात परतले. सरफराज खान (१७) आणि कार्तिक शर्मा (१८) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अपयश आले. जेमी ओव्हरटनच्या ३६ चेंडूतील ४३ धावांच्या खेळीमुळे चेन्नईने १२७ धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून नांद्रे बर्गर, जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. हेही वाचा – RR vs CSK : वैभवच्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थानचा ऐतिहासिक विजय!! चेन्नई सुपर किंग्सचा ८ विकेट्सनी उडवला धुव्वा वैभव सूर्यवंशीने १५ ठोकले वादळी अर्धशतक – प्रत्युत्तरात १२८ धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीने मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्याने केवळ १५ चेंडूत अर्धशतक ठोकले आणि १७ चेंडूत ५२ धावांची तुफानी खेळी केली. यशस्वी जैस्वालने नाबाद ३८ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. चेन्नईकडून केवळ अंशुल कंबोजला २ बळी मिळवता आले, मात्र तोपर्यंत राजस्थानने विजयावर शिक्कामोर्तब केले होता.