IPL 2024 (DC vs LSG Match 64) : स्टब्स आणि पोरेलची दमदार अर्धशतके; दिल्लीचे लखनौसमोर 209 धावांचे आव्हान

IPL 2024 (DC vs LSG Match 64, Score Update) : आज आयपीएल 2024 च्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्लीसाठी हा ‘करो या मरो’ चा सामना आहे. जर संघ हरला तर तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल. त्याचबरोबर नेट रनरेट सकारात्मक करण्यासाठी दिल्ली संघाला केवळ जिंकावे लागणार नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. दिल्ली आणि लखनौचे प्रत्येकी 12 गुण आहेत. दिल्लीचा हा 14वा सामना आहे, तर लखनौचा 13वा सामना आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत 4 बाद 208 धावसंख्येपर्यंत मजल मारली. लखनौला विजयासाठी 209 धावा कराव्या लागतील.
Innings Break!
Delhi Capitals have set a 🎯 of 2️⃣0️⃣9️⃣ in their last game of the season 👏👏
An important #LSG chase next ⏳
Scorecard ▶️ https://t.co/qMrFfL9gTv#TATAIPL | #DCvLSG pic.twitter.com/xgSg3a3OIF
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2024
दिल्लीची सुरूवात चांगली झाली नाही. दिल्लीला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. या स्पर्धेत शानदार फलंदाजी करणाऱ्या जेक फ्रेझर मॅकगर्कला आपले खातेही उघडता आले नाही. त्याला अर्शद खानने नवीन उल हकच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर शाई होप आणि अभिषेक पोरेल यांनी फटकेबाजी केली आणि पॉवरप्ले संपेपर्यंत सहा षटकांत एक विकेट गमावून 73 धावा फलकावर लावल्या होत्या. दरम्यान, अभिषेक पोरेलने 21 चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले.
त्यानंतर दिल्लीला दुसरा धक्का नवव्या षटकात 94 धावांवर बसला. शाई होप 27 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावा करून बाद झाला. त्याने अभिषेक पोरेलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 49 चेंडूत 92 धावांची भागीदारी केली. होपला केएल राहुलच्या हाती रवी बिश्नोईने झेलबाद केले. अर्धशतकानंतर लगेचच पोरेलही माघारी परतला. दिल्लीला तिसरा धक्का 12व्या षटकात 111 धावांवर पोरेलच्या रूपाने बसला. अभिषेक पोरेल 33 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 58 धावा करून बाद झाला. त्याला नवीन उल हकने निकोलस पूरनच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर सतराव्या षटकात दिल्लीला 158 धावसंख्येवर चौथा आणि मोठा धक्का कर्णधार पंतच्या रूपानं बसला. नवीन उल हकने कर्णधार ऋषभ पंतला दीपक हुड्डाकरवी झेलबाद केले. पंत 23 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 33 धावा करून बाद झाला.
मागील हंगामातील ‘या’ विक्रमाशी बरोबरी….
या मोसमात 200 पेक्षा अधिक धावसंख्येच्या बाबतीत आयपीएल 2023 ची बरोबरी झाली आहे. मागील हंगामात, 200 पेक्षा अधिक धावंसख्या 37 वेळा केली गेली होती. या हंगामात देखील 37 वेळा 200 पेक्षा अधिक धावसंख्या केली गेली आहे. लखनौने दिल्लीने केलेल्या धावसंख्येचा पाठलाग केल्यास किंवा 200 पेक्षा अधिक धावा केल्यास गेल्या मोसमातील विक्रम मोडीत निघेल.
पंत बाद झाल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल यांनी दमदार फटकेबाजी करताना संघाची धावसंख्या 208 धावांपर्यंत नेली. पटेल आणि स्टब्स दोघेही नाबाद माघारी परतले. स्टब्स 25 चेंडूत 3 चौकार अन् 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 57 तर पटेलने 10 चेंडूत 2 चौकारासह 14 धावांची नाबाद खेळी केली.
लखनौच्या गोलंदाजीबदल बोलायचे झाले तर नवीन उल हक याने सर्वाधिक 2 बळी घेतले. मात्र त्यासाठी त्याने 4 षटकात 51 धावा खर्च केल्या. त्यापाठोपाठ रवि बिश्नोई आणि अर्शद खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. बिश्नोईने 4 षटकात 26 तर अर्शदने 3 षटकात 45 धावा दिल्या.
धावफलक :
दिल्ली कॅपिटल्स : 20 षटकांत 4 बाद 208 धावा (अभिषेक पोरेल 58, ट्रिस्टन स्टब्स नाबाद 57, शाई होप 38, रिषभ पंत 33; नवीन उल हक 2-51(4.0), रवि बिश्नोई 1-26(4.0) ,अरशद खान 1-45(3.0).





