मुंबई – आयपीएल स्पर्धेचा पुढील वर्षा साठीचा लिलाव यंदा दुबईत होत आहे. या लिलावात देशी-परदेशी मिळून एकूण तब्बल 333 खेळाडू उपलब्ध झाले आहेत. मात्र, यातून केवळ 77 खेळाडूंनाच यंदा लॉटरी लागणार आहे. हा लिलाव पहिल्यांदाच देशाबाहेर व दुबईत येत्या 19 डिसेंबरला होणार आहे.
यासाठी लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या लिलावात एकूण 333 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्यात 214 भारतीय तर 119 परदेशी खेळाडू आहेत. सर्व संघांचे मिळून केवळ 77 स्लॉट शिल्लक आहेत. यातील 30 स्लॉट हे परदेशी खेळाडूंसाठी आहेत. यंदाच्या लिलावासाठी गुजरात टायटन्सच्या पर्समध्ये सर्वाधिक 38.15 कोटी रूपये बाकी आहेत. तर सर्वाधिक स्लॉट हे कोलकाता नाईट रायडर्सला भरून काढायचे आहेत.
यंदाच्या आयपीएल लिलावात नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विस्वकरंडक स्पर्धेचा प्रभाव राहणार आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे यंदाच्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची संख्या जास्त असेल. यात मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि ट्रॅविस हेड सारख्या खेळाडूंवर किती बोली लागते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
यंदाच्या लिलावात एकूण 23 खेळाडूंनी आपली बेस प्राईस ही 2 कोटी ठेवली आहे. इंग्लंडचा हॅरी ब्रूक, ख्रिस वोक्स, बेन डकेट यांनीही 2 कोटी बेस प्राईस ठेवली आहे. न्यूझीलंडच्या रचिन रविंद्र आणि अफगाणिस्तानच्या अजमतुल्लाह उमरजाई यांनी आपली बेस प्राईस 50 लाख ठेवली. मात्र या दोघांवर अनेक संघ मोठी बोली लावतील अशी शक्यता आहे.