Avatar movie trailer : 2100 कोटींहून अधिक बजेट; ‘अवतार’चा लक्षवेधक ट्रेलर प्रदर्शित, सुंदर दृश्यांचा अद्भुत संगम एकदा बघाच…!

Avatar movie trailer : अवतार या बहुप्रतिक्षित हॅालिवूड चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘अवतार‘ हा जगातील सर्वात प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक चित्रपट मानला जातो. या चित्रपटाच्या या आधीच्या भागांना प्रेक्षकांचा सर्वोत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. आता अवतारचा नवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाची सुंदर झलक ट्रेलरमध्ये दिसत आहे.
जेम्स कॅमेरॉन यांनी ‘अवतार: फायर अँड अॅश’ या अवतारच्या तिसऱ्या भागाची निर्मिती केली आहे. जेम्सच्या चित्रपटाचा पहिला भाग ‘अवतार’ आणि दुसरा भाग ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या नावाने प्रदर्शित झाला होता. आता त्याच्या तिसऱ्या भागाचे नाव ‘अवतार: फायर अँड अॅश’ असे ठेवण्यात आले आहे.
या चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्वेलमध्ये पाहण्यासारखे बरेच काही आहे. ट्रेलरमध्ये VFX चा केलेला वापर लक्ष वेधून घेत आहे. ज्यामुळे चित्रपटातील प्रत्येक सीन उत्कृष्टरित्या शूट केल्याचे दिसत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पेंडोराचे सुंदर जग दाखवण्यात आले आहे, जिथे विविध प्रकारचे प्राणी आनंदाने एकत्र राहतात. पण, हा आनंद जास्त काळ टिकत नाही.
येथे हल्ले केले जातात, ज्यामुळे जेक सुली आणि त्यांचे कुटुंब दुसऱ्या जमातीशी लढताना दिसतात. ट्रेलरमध्ये जेक सुली आणि त्यांचे कुटुंब मेटकायना जमातीसह वरंग आणि त्यांच्या सैन्याविरुद्ध लढताना दिसत आहे. यामध्ये आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे वरंग आणि कर्नल माइल्स क्वारिच एकत्र आले आहेत.
त्याचवेळी, वरंगला आग नियंत्रित करण्याची शक्ती दिली जाते, जी पेंडोराची जंगले जाळून टाकण्याच्या धोक्याची झलक देते. यामुळे आता हा चित्रपट पाहण्याची मोठी उत्सुकता अवतारच्या चाहत्यांना लागलेली आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल २१०० कोटींपेक्षा जास्त असून ‘अवतार’ हा जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. १९ डिसेंबर २०२५ ला अवतार फायर अँन्ड अँश थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे.





