IPL 2023 : ऑफ स्पीनरची उणीव जाणवली – शिखर धवन

कोलकाता -आयपीएल स्पर्धेत सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाल्यावर पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने आम्हाला ऑफ स्पीन गोलंदाजाची उणीव जाणवल्याचे सांगितले. तसेच योग्य वेळी आमच्या फलंदाजांनी जबाबदारीने खेळ केला नाही, तसेच गोलंदाजीतही आम्ही कमी पडलो, असेही म्हटले आहे.
यंदाच्या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आम्ही प्रत्येक सराव सत्रात एकमेकांशी संवाद साधत आहोत व जिथे आम्ही कमकुवत आहोत त्याकडे लक्ष देत त्यात सुधारणा कशी घडवता येईल यासाठी सातत्याने नेटमध्ये सराव करताना प्रयत्नही करत आहोत. मात्र, त्याचे अनुकूल परिणाम आम्हाला मिळाले नाहीत. मात्र अजूनही प्लेऑफची संधीही गेलेली नाही. त्यामुळे थाटात पुनरागमन करू, असा विश्वासही धवनने व्यक्त केला आहे.
या स्पर्धेतील कोलकाताचा हा पाचवा विजय आणि पंजाबचा सहावा पराभव ठरला. आता दोन्ही संघ 11 सामने खेळले असून दोघांचे 10 गुण आहेत. मात्र, चांगल्या सरस धावगतीच्या जोरावर कोलकाता पाचव्या तर पंजाब सातव्या क्रमांकावर आहे. यानंतर प्लेऑफचे चित्र रंगतदार ठरणार आहे.
अर्शदीपने अखेरचे षटक अफलातून गोलंदाजी केली. मात्र, अखेर कोलकाताचे फलंदाज सरस ठरले त्यांच्या संघात डावखुरे फलंदाज जास्त आहेत व त्यामुळेच आम्हाला ऑफ स्पीन गोलंदाजाची उणीव जाणवली, असेही धवन म्हणाला.





