“अदृश्य हातांनी माझाच नाही तर, माझ्या कुटुंबीयांचा छळ केला…’ – अनिल देशमुख

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तुरुंगातून बाहेर आले आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यानंतर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका झाली आहे. त्यानंतर ते आपल्या मूळ गावी नागपूरला परतले.
दरम्यान, नुकतंच अनिल देशमुख यांनी एका कार्यक्रमात आपल्या मनातील खंत कार्यकर्त्यांशी बोलून दाखवली आहे. ‘अदृश्य हातांनी माझाच नाही तर माझ्या कुटुंबीयांचा छळ केला आहे. खोट्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली 1 वर्ष तुरुंगात काढावे लागले याचे दु:ख आहे’. असं बोलून दाखवलं आहे.
यावेळी ते म्हणाले, ‘तब्बल 21 महिन्यांनंतर कार्यकर्त्यांशी बोलत आहे. 1 वर्ष कारागृहात काढलं. जामीन मिळावा, यासाठी सात महिने तारीखच मिळाली नाही. आज कोणत्याही पक्षाचे नाव मी घेणार नाही. अदृश्य हातांनी माझाच नाही तर माझ्या कुटुंबीयांचा छळ केला.
खोट्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली अनेक महिने मला तुरुंगात काढावे लागले याचे दु:ख आहे. पण, आता काळजी करू नका, मी परत आलो आहे”. असं ते यावेळी म्हणाले. तसेच, संकट काळातही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची साथ मिळाल्याचे देशमुख यावेळी म्हणाले.





