Mutual funds: म्युच्युअल फंडात गुंतवणूक 22% घसरली, पण SIP मधील विश्वास कायम

नवी दिल्ली – शेअरसंदर्भातील म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडात ऑगस्ट महिन्यात झालेली गुंतवणूक 22 टक्क्यांनी कमी होऊन 33, 430 कोटी रुपये इतकी झाली आहे. जुलै महिन्यात ही गुंतवणुकीचे रक्कम 42,702 कोटी रुपये इतकी होती. म्युच्युअल फंडांनी या महिन्यात नव्या योजना म्हणजे न्यू फंड ऑफर कमी उपलब्ध केल्यामुळे या गुंतवणुकीवर परिणाम झाला असल्याचे विश्लेषकांनी नमूद केले.
म्युच्युअल फंड कंपन्यांची संघटना असलेल्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया या संघटनेने ही माहिती सारी केली आहे. गुंतवणुकीवर परिणाम झाला असला तरी एकूण गुंतवणूक मात्र सलगत 54 व्या महिन्यांत वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्रावरील भारतीय गुंतवणूकदारांचा विश्वास अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होते. जुलै महिन्यात न्यू फंड ऑफरच्या माध्यमातून 9 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये त्या प्रमाणात गुंतवणूक होऊ शकली नाही.
इक्विटी म्युच्युअल फंड वर्गातील फ्लेक्सी कॅप फंडात झालेली गुंतवणूक 7,679 कोटी रुपये इतकी राहिली. मिडकॅप संदर्भातील फंडात 5,330 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. स्मॉल कॅप फंडात 4,993 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. लार्ज कॅप संदर्भातील फंडात 2,835 कोटी रुपयांची तर थेमॅटिक फंडात 3, 893 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याची माहिती जारी करण्यात आली.
इक्विटी संदर्भातील म्युच्युअल फंडाबाबतची परिस्थिती काही प्रमाणात सकारात्मक असली तरी कर्जरोख्या संदर्भातील म्युच्युअल फंडाची परिस्थिती जास्त खराब झाली आहे. रोख्यांसंदर्भातील म्युच्युअल फंडातून ऑगस्ट महिन्यामध्ये 7,980 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली.
एकूण गुंतवणूक 75.2 लाख कोटी रुपयावर –
म्युच्युअल फंडात आतापर्यंत गुंतवणूकदारांनी एकूण 75.2 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. जूलै अखेर ही रक्कम 75.36 लाख कोटी रुपये इतकी होती. ऑगस्ट महिन्यात म्युच्युअल फंडात झालेली एकूण गुंतवणूक 52, 443 कोटी रुपये होती. तर जुलै महिन्यामधील ही गुंतवणूक 1.8 लाख कोटी रुपये इतकी होती. इतर क्षेत्रात गुंतवणूक कमी झाली तरी एसआयपीच्या माध्यमातून होत असलेली गुंतवणूक वाढत असते. मात्र ऑगस्ट महिन्यात एसआपीच्या माध्यमातून झालेल्या गुंतवणुकीत मासिक पातळीवर फारसी वाढ न होता, ही गुंतवणूक केवळ 27 हजार कोटी रुपये इतकी होती.



