International Women’s Day 2026 : जागतिक महिला दिनानिमित्त हाऊस कीपिंग कर्मचाऱ्यांचा हृदयस्पर्शी गौरव
International Women's Day 2026 : मंगल भैरव उत्सव समिती व अविनाश लगड युथ फाउंडेशनचा उपक्रम

Pune(Nanded City) – पहाटेच्या अंधारात जेव्हा शहर अजून झोपेत असते, तेव्हा त्या उठतात. झाडू, पोचा, बादली घेऊन त्या निघतात कुणाची वाट न पाहता, कुणाच्या कौतुकाची अपेक्षा न ठेवता. आपल्या परिसराची स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या हाऊस कीपिंग महिला कर्मचाऱ्यांच्या कामाची आज खऱ्या अर्थाने दखल घेण्यात आली.
मंगल भैरव नांदेड सिटी, पुणे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात आणि आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला. ‘मंगल भैरव उत्सव समिती’ व ‘अविनाश लगड युथ फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगल भैरव सोसायटीतील तब्बल ३० हाऊस कीपिंग महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
ज्या समाजात त्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते, त्याच समाजातील काही संवेदनशील मने एकत्र आली आणि या ‘पडद्यामागच्या योद्ध्यां’साठी टाळ्यांचा कडकडाट केला. या भावपूर्ण सोहळ्यात सर्व ३० महिला कर्मचाऱ्यांना स्टेनलेस स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या भेट म्हणून देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला भाग्यश्री अविनाश लगड (अध्यक्षा, अविनाश लगड युथ फाउंडेशन) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच डॉ. पूनम बांबरकर, प्रा. कीर्ती दळवी, ज्योती देशमुख, संचालिका पल्लवी शिंदे, मुख्याध्यापिका जयश्री जावळे आणि दीपाली अरगडे यांच्यासह मंगल भैरव उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्राध्यापक राहुल दळवी आणि सुनील भोंगाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. केवळ सन्मान करून न थांबता, या महिलांच्या भविष्याचाही विचार करत त्यांनी बचत आणि विमा (इन्शुरन्स) काळाची गरज या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. आज मिळालेला सन्मान एका दिवसापुरता राहू नये, तर या महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, हाच त्यामागचा हेतू होता.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले, “हाऊस कीपिंग कर्मचारी हे खऱ्या अर्थाने पडद्यामागचे योद्धे आहेत. कोणत्याही संस्थेचे किंवा परिसराचे आरोग्य आणि शिस्त त्यांच्या कामावर अवलंबून असते. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता त्या आपले कर्तव्य पार पाडतात. त्यांच्या कष्टाचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.”
हे शब्द ऐकताना अनेकींच्या डोळ्यांत पाणी तरळलं. वर्षानुवर्षे केलेल्या श्रमाला आज नाव मिळालं होतं, मान मिळाला होता. हाऊस कीपिंग विभागाच्या प्रमुख मिना शेंडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समितीने केलेल्या सन्मानाबद्दल मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केले.
या संपूर्ण उपक्रमाचे शिल्पकार मंगल भैरव उत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्नील बांबरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व उपस्थितांनी मुक्तकंठाने कौतुक केले. एखाद्या सणाच्या निमित्ताने नव्हे, तर माणुसकीच्या भावनेने असा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
समितीच्या या हृदयस्पर्शी उपक्रमाचे सर्व स्तरांतून उत्स्फूर्त कौतुक होत आहे.
हेही वाचा :









