Narendra Modi : “आंतरराष्ट्रीय भागीदारी ही मानवतेच्या प्रगतीची गरज”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन
आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात ऊर्जा, अन्न, आरोग्य, सायबर आणि वित्तीय सुरक्षा असे सगळे विषय एकमेकांशी जोडलेले आहेत.

Narendra Modi : आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात ऊर्जा, अन्न, आरोग्य, सायबर आणि वित्तीय सुरक्षा असे सगळे विषय एकमेकांशी जोडलेले आहेत, अशा काळात, आंतरराष्ट्रीय भागीदाऱ्या उभ्या करणे, मानवतेची प्रगती आणि समृद्धीसाठी एक गरज बनली आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
फ्रान्समधील इव्हीयान शहरात सुरू असलेल्या जी-७ परिषदेमध्ये नव्या भागीदाऱ्यांची निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय एकात्मतेची पुनर्बांधणी या विषयावर आयोजित जनसंपर्क सत्रात ते बोलत होते.
आजच्या अनिश्चित जगात, व्यापार आणि तंत्रज्ञानाचा, काही जण स्वार्थासाठी, गैरवापर करतात, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर आविश्वासाचे वातावरण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर, कोविडच्या साथीच्या काळापासून धडा घेत, सर्व देशांनी, परस्पर विश्वास वाढवणे आणि जागतिक भागीदारीत पारदर्शकता आणण्यावर भर द्यायला हवा, असे त्यांनी अधोरेखित केले.
भारताने कायमच मानवता प्रथम या तत्वाचे पालन केले आहे. आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य, आपत्तीचा सामना करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीतील सहकार्य, मिशन लाइफ किंवा एक पेड़ माँ के नाम अभियानातून हेच तत्व दिसते आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
भारताच्या सहकार्याचा दाखला देताना त्यांनी श्रीलंकेतील चक्रिवादळ, अफगाणिस्तानमधील भूकंप, मोझंबिकमधील पूर किंवा जमैकामधील वादळाच्यावेळी भारताने केलेल्या मदतीचा उल्लेख केला.
सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय या मंत्रामुळेच वित्तीय समावेशन, आरोग्य सुरक्षा, डिजिटल ओळख, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांचे सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या बाबतीत उल्लेखनीय प्रगती साध्य करता आली आहे.
आंतरराष्ट्रीय भागीदारीचे स्वरुप निव्वळ मदत देणारा आणि मदत घेणारा ही पारंपरिक चौकट ओलांडून, परस्परांसोबत ठाम उभे राहण्याच्या आणि समान मालकी हक्काच्या भावनेवर आधारित असावी.
आंतरराष्ट्रीय कायद्यांबद्दल आदर नसणे हा आंतरराष्ट्रीय एकता उभारणीतील सर्वात मोठा अडथळा आहे, आणि या समस्येचे प्राधान्याने निराकरण करण्याची गरज आहे. शांतता आणि स्थैर्याची सुनिश्चिती करण्याकरता आंतरराष्ट्रीय भागीदारीत संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीला प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.





