पिंपरी चिंचवडमध्ये पक्षातील अंतर्गत गटबाजी उफाळली, माजी महापौर यांनी थेट राजीनामाच दिला

पिंपरी चिंचवड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर तुषार हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्षात खळबळ उडवून दिली आहे. अवघ्या काही तासांपूर्वी जाहीर झालेल्या भाजपच्या जम्बो कार्यकारिणीत फूट पडल्याची ही घटना आहे. हिंगे यांनी आपला राजीनामा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
हिंगे यांनी राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पक्षावरील नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, पिंपरी विधानसभा क्षेत्रावर भाजपकडून सातत्याने अन्याय होत आहे. “मी पक्षाकडे पिंपरी विधानसभेसाठी शहरचिटणीस पदाची मागणी केली होती, परंतु पक्षाने माझ्या मागणीची वारंवार उपेक्षा केली. या अन्यायाविरोधात मी जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे,” असे हिंगे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या पावलाने पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे.
आगामी निवडणुकांच्या तोंडावर हिंगे यांच्या राजीनाम्याने पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या एकजुटीला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील अंतर्गत कलह आणि गटबाजी आता उघडपणे समोर येऊ लागली असून, याचा निवडणूक रणनीतीवर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंगे यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. या घडामोडींमुळे पिंपरी चिंचवडमधील राजकीय वातावरण तापले असून, भाजपसमोर आता एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान आहे.





