Nagar | शाळेत सीसीटीव्ही न बसवणाऱ्यांवर कारवाई करा

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे व शासन नियमाप्रमाणे समित्या स्थापन न करणाऱ्या मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अतुल खरात यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर याठिकाणी शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याने शासनाने सर्व शाळांना आदेश दिले आहे. सर्व शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व विद्यार्थ्यांच्या समस्या आणि अडचणी पालकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक शाळेत पालक संघ व इतर विविध समित्या स्थापन करण्यात याव्यात परंतु अनेक शाळेमध्ये शासनाच्या आदेशाचे पालन होताना दिसत नाही.
त्यामुळे अशा शाळा व मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने श्रीरामपूर तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये जाऊन सीसीटीव्ही कॅमेरे व शासनाने ठरवून दिलेल्या शाळेतील पालक समिती व इतर सर्व समित्या नेमलेत की नाही, याची शहानिशा करणार आहोत,
तसे आढळून न आल्यास त्या शाळेच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही व्हावी, यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अतुल खरात, संकेत शेलार, कुणाल सूर्यवंशी, मनसे तालुकाध्यक्ष संजय नवथर, विलास पाटणी, रवी चव्हाण, अमोल साबणे, संजय शिंदे, राहुल शिंदे, संदीप विशंबर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते





