Ajit Pawar : महिला अधिकाऱ्याचा अपमान, बेकायदा मुरूम उपशाला पाठबळ; अजित पवारांची धमकीशाही उघड, नेमकं प्रकरण काय?

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धडाडी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्याची ख्याती सर्वश्रुत आहे. मात्र, बुधवारी सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात घडलेल्या एका घटनेने त्यांच्या या प्रतिमेला तडा गेला आहे. बेकायदा मुरूम उपशाच्या कारवाईदरम्यान अजित पवार यांनी करमाळ्याच्या महिला पोलीस उपअधीक्षक (DYSP) अंजली कृष्णा यांना फोनवरुन दमदाटी केल्याचा आरोप होत आहे. हा संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अजित पवारांनी बेकायदेशीर कामाला पाठबळ देत महिला अधिकाऱ्याचा अपमान केल्याचा ठपका शेतकरी संघटनेने ठेवला आहे.
काय आहे प्रकरण?
माढा तालुक्यातील कुर्डू गावात बेकायदा मुरूम उपसा जोरात सुरू आहे. या गैरकायदा कारवायांवर कारवाई करण्यासाठी DYSP अंजली कृष्णा गावात दाखल झाल्या होत्या. याचवेळी अजित पवार यांचा फोन आला. त्यांनी अंजली यांना बेकायदा मुरूमच्या गाड्या सोडण्याचे आदेश देत, “माझा आदेश आहे,” असे सांगितले. अंजली यांनी फोनवर अजित पवारांना ओळखले नाही, याचा राग आल्याने त्यांनी थेट व्हिडिओ कॉल करुन खडेबोल सुनावले. यामुळे अंजली कृष्णा यांना बांधावरच बसावे लागले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अजित पवार यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
View this post on Instagram
गुंडांचा धुडगूस, तलाठ्यांना मारहाण
अजित पवार यांच्या फोननंतर गावातील काही गुंडांनी परिस्थितीचा फायदा घेत अंजली कृष्णा यांना पळवून लावले. इतकेच नव्हे, तर गावातील दोन तलाठ्यांना मारहाण केली. तब्बल तीन तास हा गोंधळ सुरू होता. शेतकरी संघटनेच्या म्हणण्यानुसार, चुकीच्या कामासाठी उपमुख्यमंत्र्यांचा दबाव टाकला जातो, पण दोषींवर कोणतीही कारवाई होत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
शेतकरी संघटनेची आक्रमक भूमिका
जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “एकीकडे अजित पवार स्वत:ला लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणवतात, पण दुसरीकडे महिला अधिकाऱ्याला धमकावतात. ही धटींगशाही आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी अजित पवार यांनी तातडीने महिलांची माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास हजारो शेतकऱ्यांसह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सोशल मीडियावर टीकेची झोड
व्हायरल व्हिडिओनंतर अजित पवार यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी त्यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली असून, शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. बेकायदा मुरूम उपशाला पाठबळ देण्याचा आरोप आणि महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन यामुळे अजित पवार यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.





