इंदापूर – इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये एस. एस. सी. उत्तीर्ण सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.
विद्यार्थ्यांनी वर्षभर कष्ट मेहनत करून मिळवलेल्या यशाचे कुणीतरी कौतुक केले तर आणखी मेहनत करून उत्तुंग यश मिळवण्याची प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या यशाचा यतोचित सन्मान व्हावा, म्हणून प्रत्येक वर्षी प्रशालेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सत्कार समारंभासाठी इंदापूर, माळशिरस, माढा इत्यादी तालुक्यातून सुमारे 30 प्रशालेतील विद्यार्थी व पालकांनी हजेरी लावली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फेटा बांधून, ट्रॉफी, प्रगती पत्रक तसेच दिनदर्शिका देऊन सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित केले. तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा व त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व सांगताना, शालेय जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आपण यशस्वीरित्या पार केला असून, यानंतर करिअरच्या अनेक वाटा आपल्यासमोर मोकळ्या आहेत. आपल्या आवडीनुसार योग्य करिअरची निवड करून, अशाच प्रकारे येणाऱ्या काळात मेहनत करून आपल्यातून डॉक्टर, इंजिनियर चांगले अधिकारी घडावेत व आपले व आपल्या आई वडिलांचे नाव आपण उज्वल करावे असे आवाहन ढोले यांनी केले.
संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, संस्थेचे मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, सहसचिव पौर्णिमा हर्षवर्धन खाडे, संस्थेचे मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, सहसचिव पौर्णिमा हर्षवर्धन खाडे, प्रशासक गणेश पवार, प्राचार्य राजेंद्र सरगर, सर्व विभागाचे सुपरवायझर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.