Yavat | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू ..

प्रभात वृत्तसेवा
यवत – पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन दुचाकीवरून हिंगणीगाडा येथे घरी जात असताना मध्येच काळाने घाला घातला. दुचाकी रस्त्यावर उभी असलेल्या वाहनाला जाऊन धडकली. भीषण अपघातात दुचाकीवरील एका तरुण शालेय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या तरुणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि २) घडली. आदित्यच्या मृत्यूने कुटुंबाचा आधारच नियतीने हिरावून नेला आहे.आदित्य सतीश खराडे (वय २४) आणि अविनाश संभाजी खराडे (वय १९ दोघे रा. हिंगणीगाडा ता. दौंड जि.पुणे), असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आदित्य आणि अविनाश हे दोघे ही शनिवारी (दि.२) रात्री पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन दुचाकीवरून घरी जात होते.
वरवंड गावाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकचा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात आदित्य खराडे याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अविनाश खराडे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, अविनाश याचाही मंगळवारी (दि.५) उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आदित्य हा वरवंड येथील ए. सी. दिवेकर महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत एम. कॉम अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता.
त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्याने कुटुंबांची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. हे दोघे ही वरवंड येथील सायबर कॅफेत काम करुन शिक्षण घेत होते.शनिवारी रात्री उशिरापर्यंत आदित्य व अविनाश खराडे सायबर कॅफेमध्ये काम उरकून दुचाकीवरून घराकडे निघाले असता काळाने घात केला. दोघांचा ही या अपघातात दुदैवी मृत्यू झाला. दरम्यान, या दोघांच्या अपघाती मृत्यूने हिंगणीगाडा गावात शोककाळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.





