गेमचेंजरऐवजी भाजप केवळ नेमचेंजर ठरला; नवीन पटनायक यांची टीका

भुवनेश्वर : गेमचेंजर ठरण्याचे आश्वासन देऊन भाजप ओडिशात सत्तेवर आला. प्रत्यक्षात तो पक्ष केवळ नेमचेंजर ठरला, असे टीकास्त्र माजी मुख्यमंत्री आणि बिजदचे प्रमुख नवीन पटनायक यांनी सोडले. अर्थ खाते सांभाळणारे ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर विधानसभेत चर्चा झाली. त्यामध्ये सहभागी होत सभागृहातील विरोधी पक्षनेते असणाऱ्या पटनायक यांनी सत्ताधारी भाजपवर शाब्दिक हल्लाबोल केला.
भाजप सरकारच्या अर्थसंकल्पात आमच्या मागील सरकारच्या ८० टक्के योजनांचा समावेश करण्यात आला आहे. अधिक भर योजनांची नावे बदलण्यावर देण्यात आला आहे.४५ योजनांची नावे बदलण्यात आली आहेत. त्यामुळे नवे सरकार नेमचेंजर ठरले आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीआधी भाजपने अनेक आश्वासने दिली.
मात्र, त्यांची पूर्तता करण्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी म्हटले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारून बिजदला सत्तेवरून दूर केले. त्यामुळे प्रदीर्घ काळ मुख्यमंत्रिपद भुषवलेल्या पटनायक यांना विरोधी पक्षनेतेपदाची नवी भूमिका स्वीकारली लागली आहे. मवाळ व्यक्तिमत्वासाठी ओळखले जाणारे पटनायक त्या भूमिकेत शिरल्यानंतर धारदार टीका करताना दिसत आहेत.





