Inspiring Story: ९० रुपयांसाठी आजीचा एसटीने प्रवास! शिक्रापुरात आजींच्या प्रामाणिकपणाची मोठी चर्चा
Inspiring Story: जगताप ॲग्रो एजन्सीमधील ग्राहकही आजींची तळमळ पाहून अवाक; ज्येष्ठ नागरिकांकडून आजच्या पिढीने शिकण्यासारखा धडा.

Inspiring Story – शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एका शेती औषधे विक्रेत्याकडून एक महिन्यांपूर्वी बी बियाणे खते नेल्यानंतर राहिलेले नव्वद रुपये देण्यासाठी आजीने एसटीने प्रवास करून येत दुकानदाराचे नव्वद रुपये दिल्याने आजीच्या प्रामाणिक पणाची चर्चा परिसरात रंगली आहे. शिक्रापूर येथील अनिल जगताप यांच्या जगताप ऍग्रो एजन्सी येथून एक महिन्याभरापूर्वी जातेगाव बुद्रुक येथील सरुबाई बबन इंगवले या आजींनी शेतीचे काही औषधे खरेदी केले होते.
त्यावेळी आजीकडे नव्वद रुपये कमी असल्याने आजीने नंतर देईन, असे सांगितले. त्यावेळी अनिल जगताप यांनी देखील आजीचे तळमळ पाहून त्यांना चालेल, असे सांगितले. नुकतेच (दि.३) रोजी सरुबाई आजी दुकानात आल्या त्यांनी जगताप यांना तुमचे नव्वद रुपये घ्या, असे म्हटले. त्यावेळी जगताप यांनी कसले नव्वद रुपये, असे विचारले असता आजीने एक महिन्यापूर्वीचा प्रसंग सांगितला.
यावेळी तुमचे नव्वद रुपये देण्यासाठी मी एसटीने व चौकातून पायी चालत आल्याचे देखील आजीने आवर्जून सांगितले. दरम्यान, दुकानातील ग्राहकांसह सर्वच अवाक झाले. आजीने दाखवलेल्या प्रामाणिकपणा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडून खरेच काहीतरी शिकण्यासारखे असल्याची भावना दुकान चालक अनिल जगताप व माजी सरपंच संजय जगताप यांनी व्यक्त केली.
दुकानदाराने आपल्याला आपली गरज ओळखून नव्वद रुपये करता उधार राहिले. सध्या माझ्या शेतातील मालाचे पैसे झाले, देवाने मला पुरेसे दिले आणि आपल्याला कष्टाचे पुरत नसतात तर असे पैसे कुठे पुरणार म्हणून मी प्रामाणिकपणे एसटीने प्रवास करून दुकानदाराला त्यांचे नव्वद रुपये देण्यासाठी आल्याचे सरूबाई इंगवले या शेतकरी आजीने सांगितले.





