Maharashtra politics : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हाताला काम द्या, अशी मागणी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसमोर केली होती. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच विचार केला जाईल असं विधान केलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुंडे यांनी प्रकृतीचे कारण देत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मंत्रिपदाची पुन्हा संधी मिळणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून मुंडेंना मंत्रिपद मिळणार असल्यांचं वृत्त समोर आलं आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांना नारळ? शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांना देखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या दोन माजी मंत्र्यांचं पुन्हा एकदा मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुंडेंची मंत्रिमंडळात एन्ट्री झाली तर राष्ट्रवादीचे सध्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना नारळ दिला जाऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही. पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का? गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत हेही आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ते नाराज होते. पक्षाच्या कार्यक्रमाला तसेच विधीमंडळ अधिवेशनाला देखील ते गैरहजर होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासोबत सावंत यांना देखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. यामुळे पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का? हे पाहावं लागणार आहे. हेही वाचा : Salman Khan: “एक दिवस मलाही मुलं असतील…” – सलमान खानचा खुलासा