Dhananjay Munde : “मला पक्षात मोठी जबाबदारी द्या”; धनंजय मुंडेंच्या मागणीला अजित पवारांच थेट उत्तर

Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे रिकामे न ठेवता काही महत्त्वाची जबाबदारी देण्याची मागणी केली आहे. रायगडमधील एका कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी मंचावरून ही इच्छा व्यक्त केली.
त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर, याबाबत वरिष्ठ योग्य निर्णय घेतील, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं. त्यानंतर, आता अजित पवारांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल, असं म्हणत अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत.
सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन करावं
धनंजय मुंडे यांनी मंचावरून सुनील तटकरे यांचे कौतुक करताना म्हटले की, तटकरे हे कोकणचे खरे विकासपुरुष आहेत. “मला वडिलांचा आधार सुनील तटकरे यांनी दिला. त्यांनी अनेक दिग्गज नेत्यांशी घनिष्ठ संबंध ठेवले असून, महाराष्ट्रात काय चाललंय याची त्यांना पूर्ण जाण आहे.
ते कागदाशिवायही सर्वकाही जाणतात आणि वयाने आमच्यापेक्षा तरुणच आहेत!” असे गौरवोद्गार मुंडे यांनी काढले. त्यांनी पुढे सांगितले की, तटकरे यांनी पक्षाला नव्या उंचीवर नेण्यासाठी नवतरुण नेत्यांना संधी देत प्रेरणादायी नेतृत्व केले आहे. “माझ्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत तटकरे साहेबांचे भक्कम पाठबळ मला लाभले,” असेही मुंडे म्हणाले.
सुनील तटकरेंनी दिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडे यांच्या मागणीवर सुनील तटकरे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. “धनंजय मुंडे यांनी कामाची मागणी केली आहे. याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील,” असे तटकरे म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे मुंडे यांना नवीन जबाबदारी मिळणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
चंद्रकांत पाटलांचा पाठिंबा
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “धनंजय मुंडे हा चळवळीतला माणूस आहे. तो स्वस्थ बसू शकत नाही. त्यामुळेच त्यांनी कामाची मागणी केली असावी.” पाटील यांनी मुंडे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.
कोकणचा विकासपुरुष ते पक्षाचा आधारस्तंभ
धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांना ‘कोकणचा विकासपुरुष’ संबोधत त्यांच्या कार्याचा गौरव केला. तटकरे यांनी संसदेत देशहिताला प्राधान्य देताना पक्षातही नव्या चेहऱ्यांना संधी देऊन नेतृत्व सिद्ध केल्याचे मुंडे यांनी नमूद केले. या कार्यक्रमात मुंडे यांनी तटकरे यांच्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आणि त्यांच्या मागणीने पक्षातील त्यांचे स्थान आणि महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
राजकीय चर्चांना उधाण
धनंजय मुंडे यांच्या या विधानाने आणि मागणीने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना जन्म दिला आहे. आता पक्ष नेतृत्व मुंडे यांना कोणती जबाबदारी देणार आणि त्यांच्या या मागणीमुळे पक्षांतर्गत समीकरणे कशी बदलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





