अन्याय होऊ देणार नाही..! कंगना राणवतला फटकावणाऱ्या CISF महिलेची शेतकरी संघटनांकडून पाठराखण

Kangana Ranaut – खासदार बनलेली अभिनेत्री कंगना राणवत यांना चंदीगड विमानतळावर कानशिलात फटकवणाऱ्या सीआयएसएफच्या महिला जवानाच्या पाठीशी शेतकरी संघटनांनी आपली ताकद उभी करण्यास सुरूवात केली आहे. संयुक्त किसान मोर्चासह काही शेतकरी संघटनांनी महिला जवानाची पाठराखण केली असून येत्या ९ जूनला तिच्या समर्थनार्थ या संघटनांनी मोहाली येथे इन्साफ मोर्चाचे आयोजनही केले आहे.
या प्रकरणाची नीट चौकशी करून संबंधीत महिला जवानाला न्याय द्यावा अशी या संघटनांची मागणी आहे. हिमाचल प्रदेशातील मंडीमधून लोकसभेवर निवडून आल्यानंतर दोन दिवसांनी चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान या कॉन्स्टेबलने कंगना यांच्या तोंडावर मारले आणि शिवीगाळ केली, असे कंगना यांनी गुरुवारी एका व्हिडिओ संदेशात म्हटले होते.
या प्रकरणी संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा या दोन प्रमुख शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले की ते या महिला कॉन्स्टेबलच्या समर्थनार्थ उभे आहेत. संयुक्त किसान मोर्चाचे (गैर-राजकीय) नेते जगजित सिंग डल्लेवाल आणि किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सर्वन सिंग पंधेर यांनी सांगितले की,
‘ते या प्रकरणाच्या योग्य तपासासाठी पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांची भेट घेणार आहेत. आम्ही योग्य चौकशीची मागणी करू आणि महिला कॉन्स्टेबलवर अन्याय होऊ नये, असे आम्ही त्यांना सांगू’, असे डल्लेवाल यांनी पंढेर आणि इतर काही शेतकरी नेत्यांसह पत्रकार परिषदेत सांगितले.
कंगना यांच्यावर का राग होता?
या प्रकरणात या महिला कॉन्स्टेबलचे एक स्टेटमेंटही समोर आले आहे. त्यात या कॉन्स्टेबलने म्हटले आहे की, दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संबंधात कंगना यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. तेथे जे लोक जमले आहेत त्यांना शंभर दोनशे रूपये देऊन जमवले गेले आहे असे कंगना यांनी म्हटले होते. या आंदोलकांमध्ये माझी आईही होती.
तिच्यावर कंगना यांनी खोटे आरोप केल्याने या कॉन्स्टेबलने त्यांच्या कानशिलात लगावली आणि त्यांना शिवीगाळही केली.या महिला कॉन्स्टेबलच्या भावाने गुरुवारी सांगितले की, त्यांना या घटनेची माहिती मीडियाद्वारे मिळाली. तो कपुरथळा येथे राहतो. त्यांची बहीण गेल्या १५ सीआयएसएफच्या वर्षांपासून सेवेत आहे आणि तिने केरळ, चेन्नई आणि अमृतसरसह अनेक ठिकाणी सेवा दिली आहे.
डल्लेवाल आणि पंढेर म्हणाले की कॉन्स्टेबलचा भाऊही शेतकरी चळवळीत सक्रिय होता आणि त्यांच्या संघटनेचा भाग होता.कंगना यांच्या विधानाने आंदोलक शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. कंगना यांनी आपल्या निवेदनात पंजाब आणि हरियानात अतिरेकी शक्ती वाढत असल्याची चिंता व्यक्त केली आहे, या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणीही शेतकरी संघटनांनी केली आहे.





