‘मी मागील 40 वर्षांपासून…’, 70 तास कामाच्या मुद्यावर नारायण मुर्तींनी पुन्हा केले भाष्य, आता म्हणाले…

Narayana Murthy : सध्या भारतात आठवड्याला कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावे, याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरूणांनी आठवड्याला 70 तास काम करावे, असा सल्ला दिला होता. आता याबाबत त्यांनी पुन्हा एकदा मत व्यक्त केले आहे. कोणीही कोणत्याही व्यक्तीला किती तास काम करावे सांगू शकत नाही. प्रत्येकाने आत्मनिरीक्षण करायला हवे, असे मत त्यांनी आता व्यक्त केले आहे.
नारायण मूर्ती म्हणाले की, कोणीही एखाद्या व्यक्तीला जास्त तास काम करण्यास सांगू शकत नाही, परंतु प्रत्येकाने ‘आत्मपरीक्षण’ केले पाहिजे आणि त्याची गरज समजून घेतली पाहिजे.
मी इन्फोसिसमध्ये 40 वर्षांच्या कार्यकाळात दरआठवड्याला 70 तासांपेक्षा जास्त काम केले आहे. हा वादाचा मुद्दा नसून, प्रत्येकाने आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. IMC येथे वार्षिक किलाचंद स्मृती व्याख्यानानंतर एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
नारायण मूर्ती म्हणाले की, मी स्वतः सकाळी साडेसहा वाजता ऑफिसला पोहोचायचो आणि रात्री 8:30 वाजता बाहेर पडायचो. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कोणी म्हणू शकणार नाही की ही चुकीची गोष्ट आहे. मी हे मागील 40 वर्षांपासून करत आहे. जो सल्ला लोकांना दिला त्यावर जास्त चर्चा अथवा वाद घालण्याची गरज नाही.
समाजात बदल घडवून आणण्यासाठी आपण किती योगदान देत आहोत, याच्याशी आपले प्रयत्न आणि परिश्रम जोडलेले असायला हवे. खासकरून, एका गरीब मुलाच्या दृष्टीकोनातून विचार करायला हवा की, त्याचे भविष्य सुधारण्यासाठी तुमचे परिश्रम खरचं उपयोगी ठरत आहे की नाही, हे समजून घ्यायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कामाच्या तासावरून जोरदार चर्चा सुरू आहे. नारायण मुर्ती यांच्यापाठोपाठ एलअँडटी कंपनीचे चेअरमन एसएन सुब्रमण्यन यांनीही कर्मचाऱ्यांना आठवड्याला 90 तास काम करायला हवे, असे म्हटले होते.





