राज्यात तिसऱ्या लाटेत 60 लाख जणांना संसर्ग?, मुंबई पालिका आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज

मुंबई – राज्यात करोनाची तिसरी लाट आल्यानंतर किमान 60 लाख जणांना त्याचा संसर्ग होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे आपत्कालीन आणि जीव वाचवणारी आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्याचे आव्हान प्र्रशासनापुढे आहे. बेड आणि ऍक्सिजनच्या उपलब्धेतेसह शहराच्या सर्व आरोग्य सुविधांची जय्यत तयारी पालिका प्रशासनाने केली असल्याचे बृहनमुंबई महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
पालिका प्रशासनाने संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी 30 हजार बेड तयार ठेवले आहेत. चेंबूर आणि महालक्ष्मी येथे ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे करोना रुग्णांसाठी आता पालिका प्रशासनाला धावाधाव करावी लागणार नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
दुसऱ्या लाटेमध्ये महापालिकेकडे 21 हजार बेडची उपलब्धता होती. जम्बो केअर सेंटरच्या उभारणीतून 30 हजार बेडस्ची उपलब्धता होऊ शकेल. एकाचवेळी हे बेडस् खुले करणार नसले तरी जशी गरज भासेल त्यानुसार हे बेडस् खुले करण्यात येतील.
दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याकडील साधन सामग्री न्याय पध्दतीने वापरण्याची आवश्यकता आमच्या लक्षात आली अहे. ज्यावेळी बेडची मागणी नसते त्यावेळी ही सुविधा सुरू ठेवण्यात कोणतेही हाशील नाही. जर ही सुविधा सुरू ठेवायची तर आम्हाला नर्स, डॉक्टर आणि अन्य गरजेच्या यंत्रणा कंत्राटी पध्दतीने घ्याव्या लागतील. समजा तिसऱ्या लाटेय दिवसांत 10 हजार रुग्ण आढळले तर आम्ही टप्प्याने सर्व सुविधा केंद्रे सुरू करू.





