#INDvSA 2nd T20 | भारतीय संघाचा सलग दुसरा पराभव

कटक – वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमारने घेतलेल्या तीन बळींनंतरही हेनरीच क्लासेनच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान भारतीय संघाचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेने भारताला 6 बाद 148 धावांवर रोखले तेव्हाच त्यांचा विजय निश्चित झाला होता. मात्र, भुवनेश्वरने पॉवरप्लेमध्येच पाहुण्यांचे तीन फलंदाज बाद करत सामन्यात रंगत निर्माण केली होती. रीझा हैंड्रीक्स, ड्वेन प्रीटोरियस व रुसी वॅन दर दुसेन यांना बाद केल्यावर दक्षिण आफ्रिकेची स्थिती 3 बाद 29 अशी बिकट बनली होती.
कर्णधार थेम्बा बवुमाने क्लासेनला साथिला घेत डाव सावरला. बवुमा आक्रमक फलंदाजी करत ोहता मात्र, यजुवेंद्र चहलच्या अप्रतिम फिरकीवर तो फसला व 35 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 30 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावला. दुसरीकडे क्लासेन वादळी फलंदाजी करत होता. त्याचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर तो शतकाकडेही कूच करत होता. मात्र, हर्षल पटेलच्या स्लोअरवनवर तो फसला व 81 धावांवर तंबूत परतला. त्याने 46 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली.
त्यानंतर भरात असलेल्या डेव्हीड मिलरने नाबाद 20 धावांची खेळी करत 19 व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर दोन धावा धावून घेत विजयाची औपचारीकता पूर्ण केली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 4 गडी बाद केले. हर्षल पटेल व यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
तत्पूर्वी , प्रमुख फलंदाजांना एकीकडे अपयश येत असताना सलामीवीर इशान किशन, श्रेयस अय्यर व दीनेश कार्तिक यांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर यजमान बारतीय संघाने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावांपर्यंत मजल मारली होती.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार थेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकत भारताला पहिल्यांदा फलंदाजी दिली. सलामीवीर ऋतूराज गायकवाडची अपयशाची मालिका याही सामन्यात कायम राहिली. तो पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर केवळ 1 धाव काढून बाद झाला. त्यानंतर इशानने श्रेयसच्या साथित 47 धावाची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
इशान चांगला खेळत असताना 34 धावा करुन बाद झाला. त्याने 21 चेंडूत 2 चौकार व 3 षटकार फटकावले. कर्णधार ऋषभ पंतने पुन्हा एकदा आपल्या बेजबाबदारपणाचे दर्शन घडवले. तो 5 धावांवर परतला. पाठोपाठ हार्दीक पंड्यानेही निराशा केली. अक्सर पटेलही 10 धावा काढून बाद झाला. एका बाजूने अय्यर जबाबदारीने फलंदाजी करत होता. त्याला साथ देण्यासाठी कार्तिक खेळपट्टीवर आला. मात्र, त्याचवेळी अय्यरचा संयम सुटला व मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो 40 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 35 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावले.
कार्तिकने संघाला शतकी धावांची मजल मारुन दिली. तसेच त्याने हर्षल पटेलच्या साथीत बहुमोल भागीदारी करत संघाला 20 षटकांत 6 बाद 148 अशी समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली. कार्तिकने 21 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावताना नाबाद 30 धावा केल्या. हर्षल पटेल 12 धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून अनरीच नोर्जेने सर्वाधिक 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
भारत – 20 षटकांत 6 बाद 148 धावा. (श्रेयस अय्यर 40, इशान किशन 34, दीनेश कार्तिक नाबाद 30, हर्षल पटेल नाबाद 12, अनरीच नोर्जे 2-36, कागिसो रबाडा 1-15).
दक्षिण आफ्रिका – 18.2 षटकांत 6 बाद 149 धावा. (हेनरीच काल्सेन 81, थेम्बा बवुमा 35, डेव्हीड मिलर नाबाद 20, भुवनेश्वर कुमार 4-13).





