Anant Ambani: देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी सोमवारी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी साईबाबा संस्थानला ५ कोटी रुपयांची मोठी देणगी अर्पण केली आहे. नाताळच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शिर्डीत भक्तांची मांदियाळी असतानाच अंबानी यांनी ही हजेरी लावली. अनंत अंबानी यांचे सोमवारी शिर्डीत आगमन झाले. त्यांनी सायंकाळच्या वेळी साईबाबांच्या मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतले आणि श्रद्धापूर्वक धूप आरतीला उपस्थिती लावली. परंपरेनुसार, त्यांनी साईबाबांच्या समाधीवर निळ्या रंगाची शाल अर्पण केली. दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते अनंत अंबानी यांचा साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थानचे इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंबानी कुटुंब हे साईबाबांचे भक्त म्हणून ओळखले जाते. नीता अंबानी आणि आकाश अंबानी न चुकता वर्षातून दोन ते तीन वेळा शिर्डीत दर्शनासाठी येत असतात. अनंत अंबानी यांचीही साईबाबांवर मोठी श्रद्धा असून, त्यांनी यापूर्वी २५ ऑक्टोबर २०२२ रोजी देखील शिर्डीत येऊन दीड कोटी रुपयांची देणगी दिली होती. यावेळी मात्र त्यांनी ५ कोटी रुपयांची भरघोस देणगी देत आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. सध्या नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत देश-विदेशातून लाखो भाविक दाखल होत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता साई संस्थानने दर्शनासाठी जय्यत तयारी केली असून, पोलीस प्रशासनाकडूनही मंदिर परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशा गर्दीच्या वातावरणातही अनंत अंबानी यांनी शिर्डीत हजेरी लावून साईबाबांचे दर्शन घेतले.