ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात 4% वाढ; खाण, मॅन्युफॅक्चरिंग आणि वीज क्षेत्रात सुधारणा

नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादन चार टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यात खाण क्षेत्राची उत्पादकता वाढल्यामुळे एकूण औद्योगिक उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. जूले महिन्यात औद्योगिक उत्पादन 4.3 टक्क्यांनी वाढले होते.
ऑगस्ट महिन्यात खाण क्षेत्राची उत्पादकता सहा टक्क्यांनी, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता 3.8 टक्क्यांनी, वीज निर्मिती 4.1 टक्क्यांनी वाढली आहे. या तीन क्षेत्राची उत्पादकता वाढल्यामुळे औद्योगिक उत्पादन वाढण्यास मदत झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत औद्योगिक उत्पादन कमी होऊन 2.8 टक्के इतके झाले आहे.
गेल्या वर्षी या कालावधीत औद्योगिक उत्पादन 4.3टक्क्यांनी वाढले होते. ईक्रा या संस्थेच्या मुख्य अर्थतज्ञ आदिती नायर यांनी सांगितले की, औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग काहीसा कमी असला तरी आगामी काळात जीएसटी कपातीमुळे विविध उत्पादनांची मागणी वाढेल. त्या प्रमाणात औद्योगीक उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.





