Indrayani River: इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ! वारकऱ्यांना नदीपात्रात न उतरण्याचे प्रशासनाचे आवाहन
Indrayani River: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत लाखो वारकरी दाखल; मात्र मुसळधार पावसामुळे इंद्रायणीच्या वेगवान प्रवाहाचा धोका वाढला.

Indrayani River – आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा २०२६ निमित्त श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शनार्थ आणि प्रस्थान सोहळ्याचा आनंद अनुभवण्यासाठी आळंदी नगरीत लाखो भाविक आणि वारकरी दाखल होत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. तसेच पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे. या पार्श्वभूमीवर कुठलेही अनुचित घटना घडू नये म्हणून आळंदी नगर परिषदेने भाविकांना सतर्कतेचा इशारा देत इंद्रायणी नदी पात्रात न उतरण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वारीसाठी येणारे अनेक नागरिक आणि वारकरी पवित्र स्नानासाठी आणि इतर कारणांसाठी इंद्रायणी नदी पात्राकडे जातात. मात्र सध्या नदीतील पाण्याचा अंदाज घेणे कठीण झाले असून वेगवान प्रवाहामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. म्हणूनच सुरक्षिततेचा उपाय म्हणून भाविकांनी नदीपात्र स्नान करण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी नदीपात्रात उतरू नये असे कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांचे सुरक्षिततेसाठी जागोजागी सूचनांचे फलक लावले आहेत. याशिवाय आपत्ती व्यवस्थापनपथके आणि जीव रक्षक पथकेही नदी काठावर तैनात करण्यात आले आहेत. भाविकांनी प्रशासनाने लावलेल्या ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये, तसेच तेथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षक आणि स्वयंसेवकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
पालखी सोहळा सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आळंदी नगरपरिषद, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि शेकडो स्वयंसेवक आहोरात्र कार्यरत आहेत. वारीसाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचा जीव अत्यंत महत्त्वाचा असून सर्वांनी एका जबाबदार नागरिकाचे कर्तव्य चोखपणे बजावत प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे आणि प्रस्थान सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यास हातभार लावावा, अशी विनंती नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.





