वरखेडच्या ‘स्वामी समर्थ’ साखर कारखान्यात वजनात फसवणूक; शेतकरी संघटना आक्रमक!

नेवासा – माजी मंत्री विजयबापू शिवतारे चेअरमन असलेल्या वरखेड येथील स्वामी समर्थ शुगर अँड ॲग्रो इंडस्ट्रीज या खासगी साखर कारखान्यात उसाच्या वजनमापात मोठी तफावत आढळल्याने खळबळ उडाली आहे. शेतकरी संघटनेने पुराव्यासह हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर शनिवारी कारखाना कार्यस्थळावर तीव्र आंदोलन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी कामगार आणि वाहतूकदारांकडून वजनाबाबत तक्रारी येत होत्या. याची दखल घेत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास कारखान्यावर धाव घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी वजनमापात तफावत असल्याचे मान्य केले. व्यवस्थापनाच्या या कबुलीमुळे उपस्थित शेतकरी अधिकच संतप्त झाले आणि त्यांनी गेटसमोर घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला.
प्रशासकीय कारवाईला वेग
आंदोलनाची तीव्रता पाहून जिल्हा वजनमापे निरीक्षक रमेश दराडे तातडीने वरखेड येथे हजर झाले. त्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत कारखान्यातील वजन काट्यांची तांत्रिक तपासणी सुरू ठेवली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष हरिअप्पा तुवर, तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे, कायदेशीर सल्लागार ॲड. बाळासाहेब कावळे, किरण लंघे, बापूराव देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
वजनमापातील हा घोटाळा नेमका किती मोठा आहे आणि निरीक्षकांच्या तपासणीत काय निष्पन्न होते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. “शेतकऱ्यांच्या घामाच्या थेंबाचा हिशोब घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.





