Dehu News: देहूत मूर्तीदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद! गणेशोत्सवात ५ हजार ५१ मूर्तींचे संकलन
Dehu News: अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्य घाट, गाथा मंदिर आणि विविध चौकांत विशेष सोय; देहूकरांनी नदीत विसर्जन टाळून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश.

Dehu News – देहू नगरपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या मूर्तीदान उपक्रमाला यंदा गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांची गर्दी होत असताना नदीपात्रात मूर्ती विसर्जनास बंदी असल्याने अनेक भक्तांनी पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्तीदान करण्यास प्राधान्य दिले. गणेशोत्सवाच्या कालावधीत नगरपंचायतीकडून एकूण ५ हजार ५१ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले.
इंद्रायणी नदीचे धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन देहू नगरपंचायतीच्या वतीने २०२१ पासून मूर्तीदान ही संकल्पना राबविण्यात येत आहे. नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यामुळे होणारे संभाव्य प्रदूषण टाळणे आणि भाविकांना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. गेल्या काही वर्षांत या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, यंदाही विविध संकलन केंद्रांवर भाविकांनी गणेशमूर्ती जमा केल्या.
गणेशोत्सवातील दीड दिवसाच्या विसर्जनावेळी गोपाळपुरा येथील वैकुंठगमन स्थानावर विशेष संकलन केंद्र उभारण्यात आले होते. या ठिकाणी ८४ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील विविध ठिकाणी गणेशमूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना जवळच्या ठिकाणी गणेशमूर्ती दान करता यावी, यासाठी नगरपंचायतीने शहरातील विविध भागांत व्यवस्था केली होती.
मुख्य इंद्रायणी घाट, गोपाळपुरा येथील वैकुंठगमन स्थान, भैरवनाथ चौक, गाथा मंदिर, नवशा गणपती मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आणि माळीनगर येथे संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय देहू-आळंदी रस्त्यावरील बाणेर बँकेजवळ कृत्रिम तलाव, निर्माल्य संकलन केंद्रे आणि विसर्जन कुंडांचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना पारंपरिक नदी विसर्जनाऐवजी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्ती दान किंवा विसर्जन करता आले.
विसर्जनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त
गणेशोत्सवाच्या काळात देहूरोड पोलिसांकडून शहरातील विविध विसर्जनस्थळी दिवसभर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विसर्जनाच्या दिवशी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून आवश्यक नियोजन करण्यात आले.
इंद्रायणीचे पावित्र्य जपण्याचे आवाहन
इंद्रायणी नदीचे धार्मिक महत्त्व मोठे आहे. त्यामुळे नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी नदीपात्रात गणेशमूर्ती, निर्माल्य किंवा अन्य कचरा टाकू नये. गणेशमूर्ती नदीत विसर्जित करण्याऐवजी नगरपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या संकलन केंद्रांवर दान कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी नागरिक आणि भाविकांना केले.






