Pimpri-Chinchwad : धुळीने माखले पिंपरी-चिंचवड शहर; हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
धुळीचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर

पिंपरी – औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात सध्या सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील विविध भागांतील रस्त्यांची दुरवस्था, खोदकाम आणि बेसूमार बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे.
वाहनांच्या वर्दळीमुळे ही धूळ हवेत पसरत असून, नागरिकांना श्वास घेणेही कठीण होत आहे. त्यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही धुळीचे प्रमाण वाढले आहे. विविध ठिकाणी सुरू असलेल्या खोदकामांनंतर रस्त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती केली जात नसल्याने माती आणि खडी रस्त्यावर पसरलेली दिसते.
वाहनांची ये-जा सुरू असताना ही धूळ मोठ्या प्रमाणात उडते. विशेषतः दुचाकीस्वार, पादचारी आणि रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत, पण त्यामुळे धूळ नियंत्रणाच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याची दिसून येत आहे. बांधकाम साहित्य उघड्यावर ठेवणे आणि मातीची वाहतूक करताना वाहनांवर ताडपत्री न घातल्यामुळे धुळीची समस्या अधिक गंभीर बनत आहे.
धुळीचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास जाणवत आहे.
शहरातील वाढत्या धुळीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, रस्त्यांची नियमित स्वच्छता करावी, बांधकाम व्यावसायिकांवर नियमांचे पालन करण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा विकासाच्या नावाखाली वाढणारे धुळीचे प्रदूषण शहरवासीयांच्या आरोग्यासाठी गंभीर समस्या ठरण्याची शक्यता आहे.





