हिरोगिरी पडली महागात! होळीच्या कार्यक्रमाला नकार दिल्याने चक्क शिक्षकांनाच ठेवले कोंडून, विद्यार्थ्यांवर झाली कारवाई

Government Holkar Science College | होळीच्या निमित्ताने अनेक कॉलेज-महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र, मध्य प्रदेशच्या इंदूर येथील प्रतिष्ठित महाविद्यालयात होळीचा कार्यक्रम करण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पाहायला मिळाले. इंदूर येथील शासकीय होळकर सायन्स महाविद्यालयात होळीच्या कार्यक्रमास नकार दिल्याने विद्यार्थ्यांनी चक्क शिक्षकांनाच कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही घटना समोर आल्यानंतर आता विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात 4 विद्यार्थ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच, त्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना स्थलांतर दाखला घेऊन जाण्यास सांगण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनामिका जैन यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी 23 फेब्रुवारी रोजी प्राचार्यांची परवानगी न घेता महाविद्यालयाच्या परिसरात होळी उत्सव साजरा करण्याचे पोस्टर लावले होते. निर्देशानुसार हे पोस्टर हटवण्यात आले.
महाविद्यालयात ‘होलकर का होली फेस्ट’ हा कार्यक्रम 7 मार्च रोजी आयोजित केला जाणार होता. या कार्यक्रमात ‘लाईव्ह डीजे’ आणि ‘रेन डान्स’चीही व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी प्रति व्यक्ती 150 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना होळीच्या कार्यक्रमास परवनागी देण्यात आली नव्हती. तरीही हे पोस्टर लावण्यात आले होते. पोस्टर हटवण्याच्या विरोधात 4 विद्यार्थी नेत्यांच्या नेतृत्वाखाली 24 फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका व इतर प्राध्यपकांची बैठक सुरू असतानाच कॉलेजच्या यशवंत हॉलचा दरवाजा बाहेरून बंद करून वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता. जवळपास अर्धातास शिक्षकांसह 150 जणांना आत कोंडून ठेवण्यात आले होते. त्यानंतर एका कर्मचाऱ्याने खिडकीतून बाहेर येत दरवाजा उघडला.
जिल्हाधिकारी आशीष सिंग यांनी या घटनेची दखल घेत अतिरिक्त जिल्हाधिकारी (एडीएम) यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी अहवालात या कृतीला गंभीर शिस्तभंग म्हणून घोषित करत महाविद्यालयाच्या शिस्त समितीला कठोर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. आता या घटनेत दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या महाविद्यालयाबद्दल सांगायचे तर होळकर सायन्स महाविद्यालयाची स्थापना इंदूरचे तत्कालीन शासक शिवाजी राव होळकर यांनी 1891 मध्ये केली होती. हे देशातील प्रतिष्ठित महाविद्यालयांपैकी एक आहे.





