– रमेश लांजेवार होळी हा सण आपल्याकडे मोठ्या आनंदात साजरा केला जातो. मात्र, आज या सणाचा मूळ उद्देश कुठतरी हरपला आहे. मोठ्या प्रमाणात लाकूड जाळणे आणि पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे ‘पर्यावरणपूरक होळी’ची गरज आहे. देशात होळी हा सण प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात मराठी माणसांसाठी होळीचे आगळेवेगळे महत्त्व आहे. होळी म्हणजे मराठी वर्षाचा शेवटचा सण. ज्याप्रमाणे इंग्रजी वर्षानुसार डिसेंबर हा शेवटचा महिना असतो त्याचप्रमाणे होळीचा फाल्गुन महिना मराठी माणसासाठी शेवटचा महिना आहे. नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते म्हणजेच गुढीपाडवा. त्यामुळे जुने वर्ष होळी व धुलीवंदनाच्या रूपात साजरे करून जुन्या वर्षाला निरोप दिला जातो आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने केले जाते. बदलत्या काळानुसार होळी व धुलीवंदन साजरे करताना पर्यावरण व निसर्गाचे संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने कोणत्याही धर्माचे सण असो त्यांनीसुद्धा निसर्गाला कुठेही इजा पोहोचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत वाढते प्रदूषण व भीषण पाणीटंचाई सर्वांसाठी चिंतेचा आणि गंभीर विषय आहे. त्यामुळे होळी हा सण साजरा करताना पर्यावरणाशी निगडित असावा, जेणेकरून निसर्गाला इजा पोहोचणार नाही. कारण होळी या सणाला लाकूड, पाणी यांचा वापर जास्त होतो आणि या दोन्ही गोष्टी पर्यावरणाशी निगडित आहेत. होळीला दरवर्षी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. देशात आणि जगात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे होळीच्या सणाला पाण्याचा वापर टाळावा व पाणी वाचविण्याचा संकल्प सर्वांनीच करावा. उष्णतेची तीव्रता आणि पाण्याचा दुष्काळ यामुळे मानव व पशुपक्षी नेहमीच भरडला जातो. देशात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या दिवशी गुलाल, रंग इत्यादीसह केमिकलयुक्त रंगाचा वापर होतो. त्यामुळे डोळ्यांना व चेहर्याला इजा होऊ शकते. यापासून सावध राहण्याची गरज आहे. रंग खेळताना कोणीही हा विचार करत नाही की पाण्याचा अपव्यय किती होतो. उन्हाळ्यात पाण्यासाठी सर्वांनाच वणवण भटकावे लागते. आजही महाराष्ट्रात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसते. याचा परिणाम शेतकर्यांना जास्तीत जास्त भोगावा लागतो. आजच्या परिस्थितीत हवामान खाते सांगत आहे की यावर्षी उन्हाळा नेहमीपेक्षा जास्त तापणार आहे. यावरून आपण समजू शकतो की पाण्याची समस्या कमी न होता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे आज पाण्याचा एक एक थेंब वाचविण्याकरिता मानवाने कसोशीने प्रयत्न केले पाहिजे. होळीचा सण हा पाच दिवस म्हणजेच पंचमीपर्यंत चालतो. त्यामुळे या काळात पाण्याचा वापर जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे देशात अवैधरित्या जंगल तोडीमुळे लाकडांची कमतरता पाहता होळी दहनाकरिता कमीत कमी लाकडांचा उपयोग केला पाहिजे किंवा होळी दहनाकरिता गोवरीचा वापर जास्त करावा. पाण्याची समस्या पाहता फक्त देशी गुलाल किंवा फुलांचा वापर करून होळीचा आनंद घेता येतो. भारतासह संपूर्ण जगभर 22 मार्च रोजी जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. त्याची कृती होळीच्या सणाला करावी व पाणी वाचवावे. इतर देशांप्रमाणे भारतसुद्धा पाण्याच्या बाबतीत डेंजर झोनमध्ये आहे. जंगल तोडीमुळे निसर्गाचे संतुलन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हिंस्र पशू (वाघ, बिबट्या, अस्वल) इत्यादी जंगलातून गावात व शहरात शिरकाव करताना दिसतात. कारण मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी जंगल संपदेवर अतिक्रमण केल्याचे दिसून येते. खरेतर जंगलातील प्राणी शहरात येत नसून आपण जंगलाकडे आगेकूच (अतिक्रमण) करीत आहोत. त्यामुळे होळीकरिता कमीत कमी लाकडांचा वापर केला पाहिजे किंवा पालापाचोळा वापरावा. त्याचप्रमाणे होळीच्या निमित्ताने अवैध वृक्षतोड होण्याची शक्यता असते ती ताबडतोब थांबवली पाहिजे. शिवाय होळी जाळताना जी लाकडे जाळली जातात त्यामुळे प्रचंड प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरणातील प्रदूषणाची पातळी लगेच वाढलेली दिसते. होळीचे औचित्य साधून झाडे तोडण्याऐवजी प्रत्येकांनी आपल्या परिसरात एक-एक झाड लावून निसर्गाला पुनरूज्जीवित केले पाहिजे. यातच खर्या अर्थाने धुलीवंदन दिसून येईल. होळी उत्सवात उन्माद नको! हुल्लडबाजी नको. परंतु आनंद भरपूर घ्यावा. यामुळे सर्वांचेच जीवन सुरक्षित राहाण्यास मोठी मदत मिळेल. कारण आपण सुरक्षित तर निसर्ग सुरक्षित, निसर्ग सुरक्षित तर संपूर्ण जीवसृष्टी सुरक्षित, संपूर्ण जीवसृष्टी सुरक्षित तर जग सुरक्षित. यासाठी होळी सणाचे औचित्य साधून प्रत्येकांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी. होळीनिमित्ताने झाडे लावल्यामुळे एकाच दिवशी लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड होईल व पर्यावरण सुधारण्यास मोठी मदत होईल. होळीच्या निमित्ताने निसर्ग वाचविण्याच्या दृष्टिकोनातून चांगला संदेश जगभर पसरेल.