भारताची कार्यालयीन जागा एक अब्ज वर्ग फूटांच्या उंबरठ्यावर; मुंबई-पुण्यासह आठ शहरांत झपाट्याने वाढ

मुंबई – भारतातील आठ मोठ्या शहरातील व्यावसायिक घडामोडी वेगाने वाढत आहेत. त्यामुळे या आठ शहरातील कार्यालयीन जागाचे क्षेत्रफळ सध्या वाढून 893 दशलक्ष वर्ग फूट इतके झाले आहे. या जागेचे मूल्य 187 अब्ज डॉलर इतके भरते.
नाईट फ्रँक या संस्थेने या संबंधात जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, लवकरच भारतातील आठ मोठ्या शहरातील कार्यालयीन जागाचे क्षेत्रफळ एक अब्ज वर्ग फुटावर जाणार आहे. अमेरिकेतील कार्यालयीन जागाचे क्षेत्रफळ 10.2 अब्ज वर्ग फूट, चीनमधील 6.26 अब्ज वर्ग फूट, तर जपानमधील 1.77 अब्ज वर्ग फूट आहे.
2005 मध्ये भारतातील कार्यालयीन जागाचे क्षेत्रफळ केवळ 200 दशलक्ष फूट होते. ते आता 2025 मध्ये जवळजवळ एक अब्ज वर्ग फूट इतके झाले आहे. या कालावधीत भारताने या क्षेत्रात कमालीची प्रगती केली आहे. गेल्या वीस वर्षात हे क्षेत्रफळ वार्षिक 8.6% दराने वाढत आहे. सप्टेंबरमध्ये भारतातील कार्यालयीन जागाचे क्षेत्रफळ एक अब्ज वर्ग फुटापेक्षा जास्त होईल.
सध्या जगातील विविध मोठ्या शहरात ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर म्हणजे जीसीसी मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत आहेत. भारतातही जीसीसी उभारण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद ही शहरे आगेकूच करीत आहेत.





